हजारो नागरिकांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग; जलसंवर्धनाचा निर्धार‘प्रत्येक थेंब वाचवा आणि जिरवा’चा संदेश देत शहर दुमदुमले
हजारो नागरिकांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग; जलसंवर्धनाचा निर्धार
‘प्रत्येक थेंब वाचवा आणि जिरवा’चा संदेश देत शहर दुमदुमले
सातारा प्रतिनिधी :
महाराष्ट्र जलसमृद्ध करण्याच्या शासनाच्या भूमिकेला बळ देण्यासाठी आणि जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राजवाडा ते शिवतीर्थ भव्य वॉकेथॉनला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
‘पाण्याचा अपव्यय टाळा, प्रत्येक थेंब वाचवा आणि जमिनीत जिरवा’ असा संदेश देत वॉकेथॉन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी सहभागी नागरिकांनी जलसंवर्धनाचा निर्धार करत शपथही घेतली.
वॉकेथॉनला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करून दिली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ बनली पाहिजे
यावेळी बोलताना डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र जलसमृद्ध झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. मात्र ही भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नसून प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या चळवळीला सक्रिय पाठबळ देणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासोबतच तो जमिनीत जिरविण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टाळला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पाण्याचे महत्त्व आणि जलसंवर्धनाची गरज समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. जलसंवर्धन ही केवळ सरकारी योजना न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाळांमधून जलसाक्षरतेला सुरुवात
जलसंवर्धनाची जाणीव लहान वयापासूनच मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. शालेय स्तरावरून जलसाक्षरता निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. बालवयातच पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले तर भविष्यात संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जलसंधारण सप्ताहानिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांना शाळांमध्ये आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
‘एक शाळा, एक खड्डा’ मोहिमेतून पाणी जिरविण्याचा प्रयत्न
‘एक शाळा, एक खड्डा’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शोषखड्डा तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढविण्यास हातभार लागणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत प्रत्यक्ष कृतीतून जाणीव निर्माण होणार आहे.
‘माती अडवा, पाणी जिरवा’ प्रत्येकाचे कर्तव्य
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी केलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, पाणी ही केवळ निसर्गाची देणगी नसून मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. पाण्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही. त्यामुळे पाणी अत्यंत अनमोल असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
माती अडवणे आणि पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वॉकेथॉन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता त्यातून मिळालेली जलप्रबोधनाची प्रेरणा तळागाळापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.
घोषणांनी शहर दुमदुमले
सकाळी ६ वाजता राजवाडा येथून वॉकेथॉनला सुरुवात झाली. हातात जलसंवर्धनाचे संदेश असलेले फलक घेत विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी या वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवा’, ‘माती अडवा, पाणी जिरवा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वॉकेथॉनला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत नव्याने जाणीव निर्माण झाली असून, पाणी बचत आणि पाणी संवर्धनाचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी जलसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
जलसंपत्तीचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देत वॉकेथॉनने साताऱ्यात जलचळवळीला नवी ऊर्जा दिली.
Comments
Post a Comment