स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘स्वच्छतेचा संदेश’; हिलदारी अभियानाचे विविध उपक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव, ओळखपत्रांचे वाटप; विद्यार्थी-ग्रामस्थांनी काढली स्वच्छता फेरी, ३१.४६ किलो सुका कचरा संकलित
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘स्वच्छतेचा संदेश’; हिलदारी अभियानाचे विविध उपक्रम
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव, ओळखपत्रांचे वाटप; विद्यार्थी-ग्रामस्थांनी काढली स्वच्छता फेरी, ३१.४६ किलो सुका कचरा संकलित
महाबळेश्वर प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नेस्ले प्रणित हिलदारी अभियानाच्या वतीने महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद, मेटगुताड ग्रामपंचायत आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना व्यावसायिक ओळखपत्रांचे वाटप, स्वच्छता फेरी तसेच प्रत्यक्ष स्वच्छता अभियानाचा समावेश होता.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव
शहर आणि परिसराची स्वच्छता राखण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या उपक्रमांतून विशेष गौरव करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेचे खरे नायक असून, त्यांच्या कामाला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी आणि त्यांची अधिकृत ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांना व्यावसायिक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद येथे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच नगर परिषदेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ओळखपत्र वितरण कार्यक्रम पार पडला.
याच धर्तीवर मेटगुताड ग्रामपंचायत क्षेत्रात सरपंच भिकन बावळेकर, ग्रामविकास अधिकारी वैभव काळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे प्रशासक सुनील बिरामाने, ग्रामविकास अधिकारी प्रशांत रणपिसे, ग्रामस्थ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता कर्मचाऱ्यांना व्यावसायिक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची अधिकृत दखल घेण्याबरोबरच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांची स्वच्छता फेरी; पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश
जिल्हा परिषद शाळा, क्षेत्र महाबळेश्वर, ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर आणि हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्र महाबळेश्वर येथे स्वच्छता फेरी काढण्यात आली.
या फेरीत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हातात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे प्लॅकार्ड घेऊन विद्यार्थ्यांनी नागरिक तसेच पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. विविध घोषणांच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे याबाबत जनजागृती करण्यात आली.
मेटगुताडमध्ये स्वच्छता अभियान
जिल्हा परिषद केंद्र शाळा मेटगुताड, ग्रामपंचायत मेटगुताड, हिलदारी अभियान आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मेटगुताड येथील पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्ता तसेच शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल ३१.४६ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.
स्वच्छतेसाठी सामूहिक सहभागाची गरज
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमधून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याबरोबरच नागरिक आणि पर्यटकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
महाबळेश्वरसारख्या निसर्गरम्य आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिक आणि पर्यटकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
स्वच्छता कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि हिलदारी अभियानाच्या संयुक्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
Comments
Post a Comment