चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार; वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांसाठी शिंदेंचा ‘रोडमॅप’चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला गती; रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, स्ट्रीट लाईट्ससह मेट्रो व कामगार टाउनशिपचा विकास

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार; वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांसाठी शिंदेंचा ‘रोडमॅप’
चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला गती; रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, स्ट्रीट लाईट्ससह मेट्रो व कामगार टाउनशिपचा विकास

चाकण प्रतिनिधी: 

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावताना वाहतूक कोंडीवर तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी दूर करून उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन सकारात्मक असून, सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून एकात्मिक पद्धतीने रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळेगाव व चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट देऊन रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध ठिकाणांची पाहणी करताना शिंदे यांनी रस्त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी एम-६० हार्डनर, जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
पारंपरिक डांबरीकरण पावसाळ्यात वारंवार खराब होत असल्याने पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. जिओ पॉलिमर मिश्रण कमी वेळेत सेट होत असल्याने खड्डे बुजवल्यानंतर अल्पावधीतच वाहतूक सुरू करता येणार आहे. सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल बसविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
चाकण-शिक्रापूर मार्गामुळे उद्योगांना मोठा फटका
चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे औद्योगिक वाहतुकीवर परिणाम होत असून, वाहतूक कोंडीमुळे उद्योजक आणि कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या केवळ तात्पुरत्या दुरुस्तीपुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तळेगाव ते शिक्रापूर या सुमारे ५४ किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीला गती देण्याबरोबरच नाशिक फाटा-राजगुरुनगर मार्ग आणि औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामावरही भर दिला जाणार आहे. नवीन रस्त्यांची उभारणी करताना केवळ वाहनांची वाहतूक लक्षात न घेता फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅक यांचाही समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पायाभूत सुविधांसाठी विशेष नोडल समिती
औद्योगिक क्षेत्रातील समस्या समन्वयाने सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आता दर शुक्रवारी घेण्यात येणार आहे. रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, स्ट्रीट लाईट्स तसेच अन्य मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न या माध्यमातून मार्गी लावले जाणार आहेत.
उद्योजकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकारी आठवड्यातून एक दिवस औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष उपलब्ध राहणार आहेत. उद्योजकांनी आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले.
निगडी-चाकण मेट्रोसह तीन मार्गांचा विकास आराखडा
औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. निगडी-चाकण, चाकण-राजगुरुनगर आणि तळेगाव-शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत.
तसेच कामगारांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती अर्थात टाउनशिप उभारण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
वीज, पाणी आणि कचरा व्यवस्थापनावरही भर
औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे आणि लोडशेडिंगचे योग्य नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्यासह पाणीपुरवठा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देशही देण्यात आले.
चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक केंद्रबिंदू असल्याने येथे उपलब्ध पायाभूत सुविधा उद्योगांच्या वाढीला पूरक असणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासोबतच भविष्यातील औद्योगिक विस्ताराचा विचार करून नियोजन केले जाणार आहे.
उद्योगांना आवश्यक सुविधा, वाहतुकीला सक्षम पर्याय आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा देत चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण कायापालट करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl