प्रयोगशील शाळा स्पर्धेत ‘केशवराज बाबासाहेब’चा द्वितीय क्रमांक; मुख्याध्यापकांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान शाळेच्या उपक्रमशील कार्याची दखल; सुनील गायकवाड यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार
प्रयोगशील शाळा स्पर्धेत ‘केशवराज बाबासाहेब’चा द्वितीय क्रमांक; मुख्याध्यापकांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान
शाळेच्या उपक्रमशील कार्याची दखल; सुनील गायकवाड यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार
✍️ उत्तम लोखंडे ,
परभणी/सेलू प्रतिनिधी :
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रयोगशील शाळा स्पर्धेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने सेलू तालुक्यातील संस्था गटातून द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक आणि संबंधित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील उपक्रमशील व प्रयोगशील शाळांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करून शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धेतील क्रमांक निश्चित करण्यात आले. शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विविध नाविन्यपूर्ण प्रयोग तसेच शाळेच्या एकूण कार्यपद्धतीची दखल घेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या प्राथमिक विभागाची द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.
शाळेने गेल्या काही वर्षांपासून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण न देता स्पर्धा परीक्षा, विविध परीक्षा, उपक्रम आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांमध्ये सहभागी करून घेण्यावर शाळेचा भर राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाची घोडदौड सातत्याने सुरू असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुनील गायकवाड यांनी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर तसेच मार्गदर्शक शिक्षक कृष्णा पांचाळ, योगेश ढवारे, कीर्ती कुलकर्णी, रुपाली कुर्डे आणि अक्षय गायकवाड यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
तसेच जयश्री सोन्नेकर यांना ‘उत्कृष्ट वाचक’ हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, देवेंद्र कुरा, मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके तसेच ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुनील गायकवाड यांनी शाळेच्या उपक्रमशील कार्याचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. प्रयोगशील शाळा स्पर्धेतील यश ही केवळ एका क्रमांकाची बाब नसून शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही शाळेने अशाच प्रकारे उल्लेखनीय कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभारही त्यांनी मानले.
Comments
Post a Comment