खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी महापालिकांना अल्टिमेटम; आधुनिक तंत्रज्ञानाने रस्ते दुरुस्तीचे निर्देश विसर्जन व मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवा; २४ तास यंत्रणा सज्ज ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी महापालिकांना अल्टिमेटम; आधुनिक तंत्रज्ञानाने रस्ते दुरुस्तीचे निर्देश
विसर्जन व मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवा; २४ तास यंत्रणा सज्ज ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
मुंबई प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभाग घेत महापालिका प्रशासनाला खड्डे तातडीने बुजवून गणेशोत्सव खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
गणेशोत्सव हा राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा सण असून, या काळात लाखो नागरिक गणेशमूर्तींचे दर्शन, मिरवणुका आणि विसर्जनासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मिरवणूक तसेच विसर्जन मार्ग सुरक्षित राहावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
विसर्जन मार्गांवरील खड्ड्यांना प्राधान्य
राज्यातील प्रमुख शहरांमधील गणेश विसर्जन मार्ग, मिरवणुकीचे प्रमुख मार्ग आणि विसर्जन घाटांकडे जाणारे रस्ते यांचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. या मार्गांवर कोणत्याही स्वरूपाचे खड्डे राहणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित महापालिका प्रशासनाने घ्यावी, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शहरातील अंतर्गत रस्त्यांसह विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर
पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती करताना पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. तातडीने खड्डे बुजविण्यासाठी प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पावसामुळे पुन्हा-पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होऊ नये, तसेच कमी वेळेत प्रभावीपणे खड्डे बुजविता यावेत, यासाठी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांना सहजपणे तक्रार करता यावी, यासाठी विशेष फोन नंबर जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यावर भर देण्यात आला.
शहरांमध्ये रस्ते दुरुस्तीसाठी २४ तास कार्यरत यंत्रणा सज्ज ठेवावी, प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घ्यावी आणि दुरुस्तीच्या कामांची नियमित पाहणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
आयुक्तांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे
रस्ते दुरुस्तीची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली आहेत की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
गरज भासल्यास महापालिका आयुक्तांनी कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी करावी, अशी स्पष्ट सूचना शिंदे यांनी केली. नागरिकांच्या समस्या आणि रस्त्यांची वास्तविक परिस्थिती जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
‘विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न नको’
“गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा आणि अभिमानाचा सण आहे. हा उत्सव नागरिकांनी उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या आगमनात कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी एकदिलाने आणि समन्वयाने काम करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्यातील प्रमुख महापालिकांचे आयुक्त बैठकीला उपस्थित
या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह एमएमआर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते.
तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली-मिरज-कुपवाड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, इचलकरंजी आणि सोलापूर यांसह राज्यातील अन्य प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्तही बैठकीला उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये रस्ते, वाहतूक आणि विसर्जन मार्गांची व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गणेशभक्तांना अधिक सुरक्षित आणि खड्डेमुक्त मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment