नाकिंदा उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात; ६७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
नाकिंदा उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात; ६७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
नाकिंदा | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वितरण करण्यात आले, तर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच नवभारत साक्षरता अभियानातील लाभार्थींचा गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने शाळेतील तब्बल ६७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नासिरभाई बडाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले आहे.
यावेळी इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथीमधून सारा मोहसीन डांगे, मुहिद मुझफ्फर डांगे आणि मुद्दस्सीर मुख्तार महापुळे, इयत्ता पाचवीमधून मुबश्शिरा आबिदअली बडाणे आणि मरयम सईद वाईकर, तर इयत्ता सातवीमधून मिशकात मुख्तार महापुळे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता मिळवली.
तसेच नवभारत साक्षरता अभियानांतर्गत असाक्षर व्यक्तींना साक्षर करून त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कादरभाई वाईकर, सरपंच सिकंदरभाई डांगे, ग्रामपंचायत सदस्य जहिरभाई डांगे, शबाना डांगे, सुरेय्या नालबंद, अशफाकभाई खारकांडे, नासिरभाई बडाणे, ग्रामविकास अधिकारी रणपिसे यांच्यासह नाकिंदा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका शाहिस्ता शेख, आसिया पटेल आणि मुख्याध्यापक वसीम वारुणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि साक्षरता अभियानातील लाभार्थींचा सन्मान अशा विविध उपक्रमांमुळे नाकिंदा शाळेचा परिसर उत्साहाने भारावून गेला होता.
Comments
Post a Comment