डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा उपचारादरम्यान मृत्यू; फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वाद पुन्हा ऐरणीवर वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; सायन रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांनी वाचवले होते प्राण — वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित


डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा उपचारादरम्यान मृत्यू; फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वाद पुन्हा ऐरणीवर

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; सायन रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांनी वाचवले होते प्राण — वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

फलटण प्रतिनिधी : 

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा उपचारादरम्यान आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. वरिष्ठांकडून होणारा कथित जाच आणि राजकीय दबावाला कंटाळून त्यांनी मुंबईतील सायन रेल्वेस्थानक परिसरात २७ ऑगस्ट रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज, ३१ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच वर्षात या रुग्णालयाशी संबंधित दुसरा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

फिटनेस प्रमाणपत्रावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात एका राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मात्र, संबंधित प्रकरणाबाबत संशय आल्याने डॉ. रुपनवर यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची तक्रार डॉ. रुपनवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.

मात्र, तक्रारदार डॉक्टरांनाच कारवाईला सामोरे जावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींवर अपेक्षित कारवाई न होता डॉ. रुपनवर यांचे वेतन रोखण्यात आल्याने ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते, अशी माहिती समोर येत आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओने खळबळ

या संपूर्ण प्रकारानंतर डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करून आपल्यावर होत असलेल्या कथित अन्याय आणि पिळवणुकीबाबत माहिती दिली होती. न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

तसेच, आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची नावे त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तळहातावर ‘माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती प्रसाद कोंडे-देशमुख’ असा मजकूर लिहिलेला फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूप्रकरणात त्यांच्या तक्रारींची, सोशल मीडिया व्हिडिओची तसेच त्यांनी नमूद केलेल्या व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान मृत्यू

२७ ऑगस्ट रोजी डॉ. रुपनवर यांनी मुंबईतील सायन रेल्वेस्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून डॉ. रुपनवर यांना वाचवले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास

डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. संघर्षातून डॉक्टर बनलेल्या या तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह सहकारी आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची नियुक्ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात झाली होती. मात्र, मागील काही वर्षांपासून हे रुग्णालय विविध प्रशासकीय आणि अन्य वादांमुळे चर्चेत राहिले आहे. त्यातच डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूने या रुग्णालयातील प्रशासकीय वातावरण आणि कर्मचाऱ्यांवरील कथित दबावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

फलटणमध्ये तणावाचे वातावरण

डॉ. रुपनवर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर फलटण शहर आणि त्यांच्या मूळ गाव असलेल्या माळशिरस तालुक्यात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि समर्थकांनी फलटणकडे धाव घेतली. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

दरम्यान, डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक त्यांचे पार्थिव मुंबईहून फलटणच्या दिशेने घेऊन येत असल्याची माहिती आहे. जोपर्यंत डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून हलविणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याचे समजते.

संबंधित व्यक्तींना तत्काळ अटक न झाल्यास उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशाराही नातेवाईकांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांसमोर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

दरम्यान, या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती.

डॉ. रुपनवर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत डॉ. मदने दोषी आढळल्याचे सांगण्यात येत असून, त्यानुसार आजच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

न्यायाच्या मागणीने प्रकरणाला गंभीर वळण

डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारी, त्यांनी सोशल मीडियावर केलेले आरोप, डायरीतील कथित नावे, फिटनेस प्रमाणपत्रावरून झालेला वाद, वेतन रोखण्याची कारवाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूला नेमके कोणते घटक कारणीभूत ठरले, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता आणि त्यांच्या तक्रारींवर वेळीच कारवाई का झाली नाही, याचा तपास आता प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl