गिरगाव बुद्रुकमधील सी.सी. रोडच्या कामावर ग्रामस्थांचा गंभीर आरोप; निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाईची मागणी
गिरगाव बुद्रुकमधील सी.सी. रोडच्या कामावर ग्रामस्थांचा गंभीर आरोप; निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाईची मागणी
उत्तम लोखंडे
परभणी/सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील गिरगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा तसेच रस्ता निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी, पंचायत समिती सेलू यांच्याकडे केली आहे.
गिरगाव बुद्रुक येथे ‘गावांतर्गत सिमेंट रस्ता बसवणे’ या कामांतर्गत नंदकिशोर ताठे यांच्या घरापासून जनार्दन खाडे यांच्या घरापर्यंत सी.सी. रोडचे काम करण्यात आले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीतच रस्त्याची अवस्था खराब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या बांधकामात आवश्यक जाडी, मजबुती आणि गुणवत्तेचे निकष पाळण्यात आले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडणे, तडे जाणे तसेच काँक्रीटचा काही भाग उखडणे यासारखे प्रकार दिसून येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटनाही घडत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या कामाबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता, “मी तो निधी उचलून देणार, तुम्हाला काय करायचे ते करा,” असे बेजबाबदार उत्तर मिळाल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता आणि खर्चाची पडताळणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
या प्रकरणात सक्षम तांत्रिक अधिकारी किंवा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत रस्त्याच्या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. कामासाठी मंजूर झालेला निधी, अंदाजपत्रक, कामाची मोजमाप पुस्तिका, बिले व व्हाउचर्स यांची तपासणी करून त्यांच्या प्रमाणित प्रती ग्रामस्थांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, चौकशीत गैरव्यवहार किंवा निकृष्ट काम आढळल्यास संबंधित ग्रामसेवक, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून निधीची वसुली करावी आणि नागरिकांच्या हितासाठी रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने बांधून द्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर अमोल ताठे, परमेश्वर ताठे, प्रीतम ताठे, मोहन सोळंके, संदीप ताठे, सुदर्शन ताठे, कानिफनाथ ताठे, नारायण ताठे, सुरेश ताठे, दिगंबर ताठे, ज्योती खंदारे, सागरबाई अवचार, शारदाबाई अवचार, कमलबाई अवचार यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Comments
Post a Comment