वानवली-उत्तेकरमध्ये ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ; ४३ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी


वानवली-उत्तेकरमध्ये ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ; ४३ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

महाबळेश्वर तालुक्यात आरोग्य जनजागृतीला चालना; बी.पी.-शुगर, ईसीजीसह क्षयरोग, कुष्ठरोग व मोतीबिंदूची तपासणी

तापोळा प्रतिनिधी : 

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच विविध आजारांचे वेळेत निदान व उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा, उपकेंद्र तापोळा आणि ग्रामपंचायत वानवली पाली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा शुभारंभ आटेगाव येथे विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराने उत्साहात करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी श्री. अमोल माने यांनी उपस्थितांचे स्वागत करून अभियानामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवणे, आजारांचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे आणि नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, या दृष्टीने अभियानाचे महत्त्व त्यांनी विशद केले.

शिबिरादरम्यान ग्रामस्थांना क्षयरोग (TB), कुष्ठरोग, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम तसेच असंसर्गजन्य रोग (NCD) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम, स्वच्छता आणि आजारांची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख तथा वानवली-उत्तेकरचे सरपंच गणेश उतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना त्यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित तपासणी करून घ्यावी, तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळामार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपक्रमांचे आणि नागरिकांना मिळणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

४३ लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ

या विशेष आरोग्य शिबिरामध्ये एकूण ४३ लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. यामध्ये ३६ नागरिकांची बी.पी. व शुगर तपासणी, २१ जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाच्या अनुषंगाने २० संशयित रुग्णांचे थुंकी नमुने संकलित करण्यात आले.

तपासणीदरम्यान ३ संशयित मोतीबिंदू रुग्ण आणि २ संशयित कुष्ठरुग्ण आढळून आले. याशिवाय ३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य तपासणीसोबतच संभाव्य आजारांचे वेळेत निदान करण्यास मोठी मदत झाली.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

शिबिराला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अभियानाच्या पुढील टप्प्यांसाठीही सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मयूर खामकर, सोनाली निकम, शुभम थोरात, श्रीकांत माने, ऋतुजा भातोसे, वैभव वीरकर, लक्ष्मी शिंदे, किरण धनावडे, ऋतुजा शेलार आणि अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

छायाचित्रे :
१) ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आयोजित जनजागृती कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख तथा वानवली-उत्तेकरचे सरपंच गणेश उतेकर व उपस्थित मान्यवर.
२) अभियानाच्या शुभारंभप्रसंगी फीत कापल्यानंतर उपस्थित मान्यवर, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl