गणेशोत्सवाच्या सुरक्षित आयोजनासाठी महाबळेश्वर पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूचना व मार्गदर्शन; विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित
गणेशोत्सवाच्या सुरक्षित आयोजनासाठी महाबळेश्वर पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूचना व मार्गदर्शन; विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित
महाबळेश्वर प्रतिनिधी :
गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांसाठी सूचना व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता सह्याद्री रेस्ट हाऊस, पोलीस ग्राऊंड शेजारी, महाबळेश्वर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, भाविक, नागरिक तसेच पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी आणि गणेशोत्सव शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी महाबळेश्वर पोलिसांकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सव आयोजनासंदर्भात आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंडप उभारणी, वाहतूक नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक, विद्युत सुरक्षा, अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, तहसीलदार महाबळेश्वर, मुख्याधिकारी महाबळेश्वर नगरपालिका, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर तसेच कार्यकारी अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कार्यालय, महाबळेश्वर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महाबळेश्वर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, गर्दीचे नियोजन करणे, विद्युत सुरक्षेची काळजी घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने महाबळेश्वर पोलीस ठाण्याने हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. उत्सवाच्या यशस्वी आणि सुरक्षित आयोजनासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
“आपली उपस्थिती हीच गणेशोत्सवाच्या यशस्वी व सुरक्षित आयोजनाची गॅरंटी आहे. सुरक्षित गणेशोत्सव... आपली जबाबदारी!” असा संदेश महाबळेश्वर पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment