उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराबद्दल शैलेश लाहोटी यांचा ग्राहक पंचायतीतर्फे सत्कार
उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराबद्दल शैलेश लाहोटी यांचा ग्राहक पंचायतीतर्फे सत्कार
✍️उत्तम लोखंडे
परभणी/सेलू प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा विभागीय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार सेलू येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सेलू यांच्या वतीने गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी शैलेश लाहोटी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अधिकारी म्हणून काम करताना लोकाभिमुख प्रशासन, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता आणि विविध प्रशासकीय कामांमध्ये प्रभावीपणे समन्वय साधण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे. विभागीय पातळीवर उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरव झाल्याने सेलू तालुक्याच्या प्रशासनिक क्षेत्रातही या पुरस्काराचे विशेष महत्त्व मानले जात आहे.
या निमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्या हस्ते शैलेश लाहोटी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास सेलू तालुकाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष रवी कुलकर्णी, सचिव गंगाधर कान्हेकर, प्रा. के. डी. वाघमारे, नवल किशोर काबरा, प्रदीप कौसडीकर, सिद्धार्थ गायकवाड, सुनील गायकवाड, नागोराव देशमुख, अशोक काकडे, डॉ. ऋतुराज साडेगावकर, सुखाचार्य शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विलास मोरे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्याची भूमिका स्पष्ट केली. ‘कल्याणकारी अर्थव्यवस्था, लोकाभिमुख प्रशासन आणि शोषणमुक्त समाज’ या त्रिसूत्रीच्या अंतर्भूत संकल्पनेतून अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजना आणि प्रशासकीय सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी लोकाभिमुख प्रशासन महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा ग्राहक पंचायतीने जपली आहे. शैलेश लाहोटी यांना मिळालेला उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार हा त्यांच्या प्रशासकीय कार्याची पोचपावती असल्याचे डॉ. मोरे यांनी नमूद केले.
पुरस्कार मिळाल्यानंतर ग्राहक पंचायतीने केलेल्या सत्काराबद्दल शैलेश लाहोटी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रशासनात कार्यरत असताना सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हीच आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शैलेश लाहोटी यांना मिळालेल्या विभागीय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराबद्दल सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या प्रशासकीय कार्याचा गौरव झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक संदेश निर्माण झाला असून, लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने काम करण्यास या सन्मानामुळे अधिक प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment