पुण्यातील प्रमुख मार्गांवर पार्किंगला लगाम; डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूडसह सहा वाहतूक विभागांत ‘नो पार्किंग’ झोन वाहतूक कोंडी व रस्त्यावरील अडथळे कमी करण्यासाठी नव्या पार्किंग व्यवस्थेची अंमलबजावणी; नागरिकांना १३ सप्टेंबरपर्यंत सूचना देण्याचे आवाहन
पुण्यातील प्रमुख मार्गांवर पार्किंगला लगाम; डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूडसह सहा वाहतूक विभागांत ‘नो पार्किंग’ झोन
वाहतूक कोंडी व रस्त्यावरील अडथळे कमी करण्यासाठी नव्या पार्किंग व्यवस्थेची अंमलबजावणी; नागरिकांना १३ सप्टेंबरपर्यंत सूचना देण्याचे आवाहन
पुणे प्रतिनिधी :
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शहरातील विविध प्रमुख भागांमध्ये नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत. डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, येरवडा, चंदननगर आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत विविध ठिकाणी पार्किंगसंदर्भात नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी निर्गमित केले आहेत.
या निर्णयामुळे संबंधित रस्त्यांवर वाहने उभी करण्यास निर्बंध येणार असून, काही ठिकाणी समांतर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवणे आणि महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ नियंत्रित करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
डेक्कन विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी नो पार्किंग
डेक्कन वाहतूक विभागांतर्गत आपटे रोडवरील धनराज सोसायटीच्या गेटसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मिळून ५० मीटर अंतर नो पार्किंग झोन करण्यात आले आहे. तसेच कमला नेहरू पार्कच्या मुख्य गेटसमोर १५० मीटर परिसरात नो पार्किंग लागू करण्यात येणार आहे.
आपटे रोडवरील भाऊसाहेब शेळके पथ येथील मनीषा अपार्टमेंटसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २० मीटर अंतरात नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.
सिंहगड रोडवरही पार्किंगला निर्बंध
सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत जय श्री आई माता किचन वेअर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटर अंतर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
नऱ्हे येथील महाराष्ट्र बँक चौकातील मल्हारगड सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर २० मीटर अंतरात नो पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोथरूडमध्ये तीन ठिकाणी नो पार्किंग
कोथरूड वाहतूक विभागांतर्गत साम्राज्य बळवंतपुरम सोसायटीच्या गेट क्रमांक १ आणि गेट क्रमांक २ च्या दोन्ही बाजूंना भिंतीलगत १० मीटर अंतरात नो पार्किंग करण्यात येत आहे.
तसेच मातोश्री आश्रमकडून गिरिजा चौकातून डावीकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूंना २५ मीटर अंतर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. डीपी रोडवरील पंडित फार्मच्या गेट क्रमांक १ ते ३ दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही नो पार्किंग लागू करण्यात येणार आहे.
येरवडा विभागात पार्किंगची नवी रचना
येरवडा वाहतूक विभागांतर्गत विश्रांतवाडी ते एअरपोर्ट मार्गावर सिद्धेश्वर चौक ते केकाण पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी समांतर पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे.
याशिवाय ५०९ चौकाकडून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर सिद्धेश्वर चौकापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येणार आहे.
चंदननगरमध्ये १५० मीटर परिसर नो पार्किंग
चंदननगर वाहतूक विभागांतर्गत गंगा अल्टस सोसायटीसमोरील रस्त्यावर डाव्या बाजूस १०० मीटर आणि उजव्या बाजूस ५० मीटर अंतरात नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.
विश्रामबागमध्ये नो पार्किंगसह पी-१, पी-२ पार्किंग
विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत मौजे गोपाळ गायन समाज बिल्डिंग आणि लिमये होम या दोन्ही इमारतींसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंना १५ मीटर अंतरात नो पार्किंग करण्यात येत आहे.
तर राधा स्वामी सत्संग ते नाबार्ड सोसायटी या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पी-१ आणि पी-२ प्रकारची पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सूचनांसाठी मुदत
या नव्या वाहतूक व पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकांना काही सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास ते १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात संबंधित विभागाकडे कळवावेत, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदलांमुळे महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगला आळा बसण्यास तसेच वाहतूक सुरळीत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी नव्या पार्किंग नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment