तापोळ्यातून कोयना-सोळशी-कांदाटी विभागासाठी सर्व्हिस लाँच सेवा सुरू!
तापोळ्यातून कोयना-सोळशी-कांदाटी विभागासाठी सर्व्हिस लाँच सेवा सुरू!
दुर्गम भागातील नागरिकांसाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय; ‘कोयना’, ‘सावित्री’ आणि ‘गायत्री’ बोटी सेवेत
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
जिल्हा परिषद अंतर्गत तापोळा येथून कोयना, सोळशी आणि कांदाटी विभागातील नागरिकांसाठी आजपासून सर्व्हिस लाँच बोट सेवा सुरू करण्यात आली. दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांच्या दळणवळणासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार असून, नागरिकांनी या जलवाहतूक सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोयना, सावित्री आणि गायत्री अशी या सेवेत दाखल करण्यात आलेल्या बोटांना नावे देण्यात आली आहेत. या बोटींच्या माध्यमातून कोयना, सोळशी आणि कांदाटी विभागातील नागरिकांना प्रवासासाठी अधिक सोयीस्कर आणि जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्ते वाहतुकीला अडथळे निर्माण होत असताना या जलवाहतूक सेवेचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
सेवा सुरू करण्याच्या प्रसंगी सभापती शकुंतला चोरमले यांच्या हस्ते कोयनेची ओटी भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ, गटविकास अधिकारी विभुते साहेब, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, वंदना भिलारे, तालुकाप्रमुख गणेश उतेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल सपकाळ, सुभाष कदम, शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, उपतालुकाप्रमुख राम सकपाळ, तसेच सिताराम धनावडे, शंकर कारंडे, प्रतीक धनावडे, संतोष पवार, प्रकाश माने, बाळू माने, सुपरवायझर पिंटू पवार आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कोयना, सोळशी आणि कांदाटी हा परिसर भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून, अनेक गावांतील नागरिकांना विविध शासकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि बाजारपेठेच्या कामांसाठी प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत नियमित सर्व्हिस लाँच सेवा सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
जलवाहतूक सेवा ही केवळ प्रवासाची सुविधा न राहता या दुर्गम भागाच्या विकासाला चालना देणारी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी बोटींचा सुरक्षित आणि जास्तीत जास्त वापर करून ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोयना, सावित्री आणि गायत्री या तीन बोटींच्या माध्यमातून सुरू झालेली ही सेवा कोयना-सोळशी-कांदाटी विभागातील नागरिकांसाठी नव्या दळणवळण पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
Comments
Post a Comment