नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट; कुटुंबीयांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन
नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट; कुटुंबीयांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा प्रतिनिधी :
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, अशा व्यक्तींनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सातारा यांनी केले आहे.
नेपाळमध्ये सध्या असलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांची सुरक्षितता आणि त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे संबंधित पर्यटक अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
☎️ 02162-232349
☎️ 02162-232175
📱 9657521122
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकाची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचे नाव, प्रवासाचा तपशील तसेच उपलब्ध असल्यास कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध घेणे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुढील कार्यवाही व समन्वय साधणे प्रशासनाला अधिक सुलभ होणार आहे.
रसुवा जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मीडिया किंवा अनधिकृत माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या अपुऱ्या किंवा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती मिळविणे, संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे आणि उपलब्ध माहितीनुसार पुढील कार्यवाही करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
नेपाळमध्ये आपल्या कुटुंबातील किंवा परिचयातील कोणी व्यक्ती सध्या प्रवासासाठी गेलेली असल्यास आणि तिच्याशी संपर्क होत नसल्यास विलंब न करता सातारा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Comments
Post a Comment