तीन महिन्यांपासून दिव्यांग पेन्शन रखडली; सेलू तहसील कार्यालयावर दिव्यांग बांधवांचे निवेदन
तीन महिन्यांपासून दिव्यांग पेन्शन रखडली; सेलू तहसील कार्यालयावर दिव्यांग बांधवांचे निवेदन
दरमहा ₹२,५००ची थकीत पेन्शन तातडीने खात्यावर जमा करण्याची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा
✍️ उत्तम लोखंडे,
सेलू | प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी दरमहा ₹२,५००ची पेन्शन गेल्या तीन महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या लाभार्थ्यांची रखडलेली पेन्शन तातडीने अदा करावी, या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सेलू तहसीलदारांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शासनाच्या नियमानुसार पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ₹२,५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, एप्रिल २०२६पासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शनची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे दिव्यांग नागरिकांसमोर दैनंदिन गरजा भागविण्यासह औषधोपचार, घरखर्च आणि इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पेन्शन ही अनेक दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नियमित उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून पेन्शन रखडल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रश्नी लाभार्थ्यांनी यापूर्वीही तहसील कार्यालयात अनेक वेळा पाठपुरावा केला; मात्र अद्याप समस्या पूर्णपणे निकाली निघालेली नसल्याची तक्रार करण्यात आली.
सेलू तालुक्यातील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना नियमितपणे पेन्शन मिळावी, कोणताही पात्र लाभार्थी शासकीय लाभापासून वंचित राहू नये आणि एप्रिलपासूनची थकीत पेन्शनची संपूर्ण रक्कम तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे.
दरम्यान, या मागणीची तातडीने दखल घेऊन पेन्शन वितरणातील अडथळे दूर न केल्यास सेलू तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आता या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि रखडलेली पेन्शन कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते, याकडे दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर गुलाबराव खेडकर, प्रा. राजाराम झोडगे, उत्तम लोखंडे, अंकुशराव पांढरे, कैलास गोरे, रामेश्वर भक्त पांचाळ, शिवाजी अवचार, भारत पांचाळ, मधुकर ठोंबरे, सोनाजी अंभोरे, महादेव सरोदे, पवन बनसोडे, संजय उफाडे, शिवाजी शिरसागर, अर्चना सावंत, अनंता महाजन, आराध्या राठोड, अली शेख यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment