कोयनेच्या सुपुत्र भरत सकपाळ यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्कार सामाजिक, कामगार व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कोल्हापुरात मान्यवरांच्या हस्ते सन्मान
कोयनेच्या सुपुत्र भरत सकपाळ यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्कार
सामाजिक, कामगार व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कोल्हापुरात मान्यवरांच्या हस्ते सन्मान
मुंबई प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेचे सुपुत्र तथा गोरेगाव पूर्व, मुंबई येथील रहिवासी आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य गुणवंत कामगार पुरस्काराचे मानकरी श्री. भरत हरिबा सकपाळ यांना त्यांच्या सामाजिक, कामगार, पत्रकारिता आणि समाजहिताच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील शाहू महाराज भवन येथे राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक, सहकार, कला, सांस्कृतिक, कामगार तसेच सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुरेश केसरकर यांच्या हस्ते भरत सकपाळ यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भरत सकपाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, कोविड काळातील मदतकार्य, आदिवासी, वंचित व गरजू विद्यार्थ्यांना मदत, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
याशिवाय जयसिंगपूर येथील आई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना मदत करण्याबरोबरच सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातूनही त्यांनी समाजहिताचे विविध प्रश्न मांडले आहेत. त्यांच्या या बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपल्या मनोगतातून समाजहितासाठी अष्टपैलू कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमुळे अधिक प्रेरणा मिळते, असे सांगत भरत सकपाळ यांच्या कार्याचे कौतुक केले.
भरत सकपाळ यांना यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य गुणवंत कामगार पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे कोयनेचे आणि वेंगळे गावाचे नाव उज्ज्वल झाले असून गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पुरस्काराबद्दल भरत सकपाळ यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, कामगार, पत्रकारिता आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत, सखाराम जाधव, अनिल महाणे, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ डॉ. प्रभाकर कांबळे, केरबा डावरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, गुणवंत कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. संस्थेच्या सचिव अनिता काळे यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी आणि उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment