उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर तापोळा विभागाला मोठा दिलासा; महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील एसटी सेवा पुन्हा सुरूरस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण; तापोळा, शिंदी, गोगवे व कलमगाव मार्गांवरील बससेवा पूर्ववत — हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिकांना दिलासा


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर तापोळा विभागाला मोठा दिलासा; महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील एसटी सेवा पुन्हा सुरू

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण; तापोळा, शिंदी, गोगवे व कलमगाव मार्गांवरील बससेवा पूर्ववत — हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिकांना दिलासा

संतोष मालुसरे,

तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तापोळा विभागातील जनतेसाठी बंद असलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व सुरळीत करण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे तापोळा विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाबळेश्वर–तापोळा मार्ग हा तापोळा विभागातील अनेक गावांसाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिक नियमित प्रवास करतात. अतिवृष्टीमुळे रस्त्याची वाहतूक विस्कळीत झाल्याने एसटी सेवा बंद झाली होती. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची अंतिम पाहणी तालुका प्रमुख श्री. गणेश उतेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित झाल्यानंतर महाबळेश्वर–तापोळा, महाबळेश्वर–शिंदी, महाबळेश्वर–गोगवे आणि महाबळेश्वर–कलमगाव या मार्गांवरील एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तापोळा विभागातील हजारो नागरिकांना दळणवळणाची सुविधा पूर्ववत मिळणार असून विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयातील प्रवासासह शेतमाल वाहतूक, बाजारपेठेतील ये-जा आणि स्थानिक व्यवसायांनाही याचा फायदा होणार आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षित झाल्यानंतर एसटी सेवा तातडीने सुरू करण्यासाठी तत्परता दाखविल्याबद्दल महाबळेश्वर आगार प्रमुख श्री. महेश जाधव यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजित संकपाळ, पंचायत समिती उपसभापती श्री. संजय मोरे, युवासेना पदाधिकारी श्री. सचिन कदम, श्री. विशाल संकपाळ, श्री. आनंद धनावडे, श्री. राम संकपाळ तसेच नगरपालिका अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तापोळा विभागातील एसटी सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा महाबळेश्वर शहराशी असलेला संपर्क अधिक सुलभ होणार असून, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि दैनंदिन व्यवहारांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तापोळा मार्गाची अंतिम पाहणी करताना तालुका प्रमुख श्री. गणेश उतेकर, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी व स्थानिक नागरिक.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl