महसूल दिनानिमित्त सेलू–जिंतूर तालुक्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटीलांचा गौरव; लोकाभिमुख सेवेला सलाम
महसूल दिनानिमित्त सेलू–जिंतूर तालुक्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटीलांचा गौरव; लोकाभिमुख सेवेला सलाम
महसूल विभागाच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान; प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन केला गौरव
उत्तम लोखंडे
परभणी / सेलू प्रतिनिधी :
महसूल दिनानिमित्त सन २०२५–२६ या महसुली वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेलू व जिंतूर तालुक्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी, महसूल सेवक तसेच पोलिस पाटील यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेलू येथे बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलूचे उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश लाहोटी होते. यावेळी सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, जिंतूरच्या तहसीलदार श्रीमती शितल कच्छवे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, महसूल सेवक आणि पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महसूल विभागामार्फत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महसूल प्रशासनातील कार्यक्षमता, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे तसेच उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. महसूल सेवक, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, सहाय्यक महसूल अधिकारी तसेच नायब तहसीलदार यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी मागील महसुली वर्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. नागरिकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही समर्पित वृत्तीने काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश लाहोटी यांनी सेलू व जिंतूर तालुक्यातील महसूल विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, महसूल सेवक आणि पोलिस पाटील यांचे अभिनंदन केले. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून महसूल विभागाची उत्कृष्ट कार्यपरंपरा कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सरकटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा देशमुख, मनोहर चिंचाने (महसूल सहाय्यक), हरीश टाक (महसूल सहाय्यक), अशोक राऊत (महसूल सहाय्यक), ओम कानडे (ग्राम महसूल अधिकारी) तसेच महसूल विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महसूल दिनानिमित्त झालेल्या या गौरव सोहळ्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, भविष्यात अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख महसूल प्रशासन देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment