महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील १०५ गावांना मोठा दिलासा; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी सेवा पूर्ववत, आजपासून नवीन वेळापत्रक लागू
महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील १०५ गावांना मोठा दिलासा; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी सेवा पूर्ववत, आजपासून नवीन वेळापत्रक लागू
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर–तापोळा मुख्य रस्ता खचल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील तब्बल १०५ गावांचा महाबळेश्वरशी संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला होता. रस्ता बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत प्रशासन आणि एसटी विभागाशी समन्वय साधला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ पासून महाबळेश्वर–तापोळा एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन १०५ गाव समाजाचे अध्यक्ष घनश्याम आपा सकपाळ, ४५ गाव समाजाचे अध्यक्ष आनंद दादा मुरडे, ३२ गाव समाजाचे अध्यक्ष धोंडिबा शेठ धनावडे, ज्येष्ठ समाजसेवक बाबुदादा सकपाळ, भाऊसाहेब मोरे, संपत भाऊ जाधव आणि कृष्णा कदम यांनी नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच संजय जंगम यांची भेट घेऊन नागरिकांच्या अडचणींचे निवेदन सादर केले.
निवेदनाची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी कोणताही विलंब न करता महाबळेश्वर एसटी आगाराचे प्रमुख जाधव यांच्यासोबत तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीत विद्यार्थी, नोकरदार आणि दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन एसटी सेवा त्वरित सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षांच्या समन्वयातून प्रशासन आणि एसटी विभागाने तत्काळ कार्यवाही करत आजपासून नवीन वेळापत्रकानुसार बसच्या फेऱ्या सुरू केल्या.
एसटी बसचे नवीन वेळापत्रक
पहिली फेरी (सकाळी)
तापोळा : सकाळी ७.३० → महाबळेश्वर : ८.३०
महाबळेश्वर : सकाळी ९.३० → तापोळा : १०.३०
दुसरी फेरी (दुपारी)
तापोळा : सकाळी ११.३० → महाबळेश्वर : १२.३०
महाबळेश्वर : दुपारी २.०० → तापोळा : ३.००
तिसरी फेरी (संध्याकाळी)
तापोळा : सायंकाळी ५.०० → महाबळेश्वर : ६.००
महाबळेश्वर : सायंकाळी ६.३० → तापोळा : ७.३०
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या शेवटच्या फेरीनंतर बसचा मुक्काम तापोळा येथेच राहणार असून त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळची पहिली फेरी वेळेवर सुरू होणार आहे.
रस्ता बंद झाल्याने गेल्या काही दिवसांत नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते, तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अशा परिस्थितीत नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी तातडीने प्रश्न हाताळत प्रशासन, एसटी विभाग आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रभावी समन्वय साधला. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आणि सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे १०५ गावांतील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी सेवा पूर्ववत झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष सुनील शिंदे, स्थानिक पदाधिकारी, समाजसेवक, एसटी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले असून, महाबळेश्वर–तापोळा मुख्य रस्त्याची दुरुस्तीही तातडीने पूर्ण करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment