मोरयाच्या पेढ्या'ला मिळणार पर्यटनाची नवी ओळख; सुरक्षित पायवाटेसाठी आरएफओ मोहिते यांचा सकारात्मक प्रतिसाद
'मोरयाच्या पेढ्या'ला मिळणार पर्यटनाची नवी ओळख; सुरक्षित पायवाटेसाठी आरएफओ मोहिते यांचा सकारात्मक प्रतिसाद
प्रतापगड | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गाव हद्दीतील निसर्गरम्य 'मोरयाच्या पेढ्या' हे पर्यटनस्थळ लवकरच पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित आणि आकर्षक स्वरूपात विकसित होण्याच्या मार्गावर आहे. या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी वन विभागाने सकारात्मक भूमिका घेतली असून, वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) मोहिते यांनी नुकतीच परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षित पायवाट उभारण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कुंभरोशी गावातील युवकांनी या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पुढाकार घेत वन विभागाकडे सुरक्षित पायवाट, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संरक्षणात्मक उपाययोजना तसेच पर्यावरणपूरक पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आरएफओ मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह स्थळाची पाहणी केली. पाहणीदरम्यान पर्यटनस्थळाची भौगोलिक परिस्थिती, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि पर्यावरणाचे संवर्धन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ आणि पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे वन विभागाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी अजित कारंडे, कृष्णा कदम, नयन मोरे, अमोल ढेबे, जितेंद्र कारंडे यांच्यासह कुंभरोशी गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यटनस्थळाचा विकास करताना पर्यावरणाचे संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता आणि स्थानिकांच्या सहभागाला प्राधान्य देण्याची मागणी केली.
'मोरयाच्या पेढ्या' हे कुंभरोशी परिसरातील निसर्गरम्य, शांत आणि पर्यटकांना भुरळ घालणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र सुरक्षित पायवाट आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक पर्यटकांना येथे पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता वन विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे या ठिकाणी सुरक्षित पायवाट, आवश्यक सूचना फलक आणि इतर सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पर्यटनस्थळाचा नियोजनबद्ध विकास झाल्यास महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यटन नकाशावर आणखी एका आकर्षक स्थळाची भर पडणार आहे. त्याचबरोबर स्थानिक युवकांना मार्गदर्शक, वाहन सेवा, खाद्यपदार्थ विक्री, होमस्टे, हस्तकला आणि इतर पर्यटनपूरक व्यवसायांच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळाचा विकास हा केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर कुंभरोशी परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठीही महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment