खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती; कुरोशी–वारणेवाडी मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुरोशी–वारणेवाडी मार्गावरील रस्ता खचल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित यंत्रणेकडून तातडीने आवश्यक उपाययोजना व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. त्यानंतर रस्त्याची प्राथमिक दुरुस्ती पूर्ण झाल्याने कुरोशी ते वारणेवाडी हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तथापि, पावसाचा जोर कायम असल्याने रस्त्याच्या काही भागात अद्याप धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने प्रवास करावा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनीही रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडत असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment