महाबळेश्वरात पावसाचा कहर! चतुरबेटचा संपर्क तुटला; रस्ता बंद, संरक्षक भिंत कोसळली, शेतकऱ्याचा बैल दगावला
महाबळेश्वरात पावसाचा कहर! चतुरबेटचा संपर्क तुटला; रस्ता बंद, संरक्षक भिंत कोसळली, शेतकऱ्याचा बैल दगावला
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः निसर्गाचा रौद्रावतार धारण केला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते बंद होणे, दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच मालमत्तेबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तालुक्यातील चतुरबेट गावात मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गावाचा मुख्य संपर्क काही काळासाठी तुटल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम झाला. झाड हटवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न सुरू असून नागरिकांना शक्य तितक्या लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याच गावात नुकतीच उभारण्यात आलेली संरक्षक भिंतही अतिवृष्टीचा तडाखा सहन करू शकली नाही. सततच्या पावसामुळे भिंत कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून संबंधित बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अतिवृष्टीचा मोठा फटका शेती आणि पशुधनालाही बसला आहे. चतुरबेट येथील शेतकरी अमृता कों. जाधव यांचा बैल पावसामुळे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बैल दगावल्याने संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेचा तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याशिवाय तालुक्यातील विविध डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत असून काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरडप्रवण भागातील नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामग्री सज्ज ठेवावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करून बाधित नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी चतुरबेटसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Comments
Post a Comment