"खड्ड्यांत झाडे, प्रशासनाला जाग! मेटतळे ग्रामस्थांचा अनोखा निषेध; महाबळेश्वर–प्रतापगड मार्गाच्या दुरवस्थेवर संताप"

"खड्ड्यांत झाडे, प्रशासनाला जाग! मेटतळे ग्रामस्थांचा अनोखा निषेध; महाबळेश्वर–प्रतापगड मार्गाच्या दुरवस्थेवर संताप"

महाबळेश्वर प्रतिनिधी :

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटनवाढीच्या घोषणा सातत्याने होत असल्या, तरी प्रत्यक्षात महाबळेश्वर–मेटतळे–प्रतापगड मार्गाची दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि अपुऱ्या देखभालीमुळे नागरिक व पर्यटक त्रस्त झाले असून, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेटतळे ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले.

महाड नाका परिसर, अप्सरा हॉटेलजवळ तसेच महाबळेश्वर–प्रतापगड मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचा आकार इतका मोठा झाला आहे की, "रस्ता आहे की खळगा?" असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील पावसाळ्यात काही ठिकाणी केवळ तात्पुरते काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा खड्डे बुजविण्याचे कोणतेही काम झाले नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच गंभीर बनली असून वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे.

महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांनीही या रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. "देश-विदेशातील पर्यटक ज्या पर्यटनस्थळी मोठ्या अपेक्षेने येतात, तेथील रस्त्यांची ही अवस्था अत्यंत निराशाजनक आहे. दाट धुक्यात खड्डे दिसत नाहीत. अचानक वाहन खड्ड्यात आदळल्याने अपघात होण्याची भीती कायम असते. वाहनांचे मोठे नुकसान होते आणि कुटुंबासह प्रवास करताना असुरक्षित वाटते," अशा प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्या.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महाबळेश्वर–प्रतापगड हा सुमारे २२ किलोमीटरचा अत्यंत महत्त्वाचा पर्यटन घाटमार्ग असून दररोज हजारो पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मात्र अनेक ठिकाणी डिव्हायडर नाहीत, साईडपट्ट्यांचा अभाव आहे आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर बनते.

ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, "महाबळेश्वरच्या पर्यटनातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र पर्यटकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यात संबंधित यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उद्या एखादा गंभीर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?"

रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा अनोखा मार्ग स्वीकारला. "रस्ते दुरुस्त होत नसतील, तर निदान या खड्ड्यांत झाडे तरी वाढतील," असा उपरोधिक संदेश देत त्यांनी शासनाच्या निष्क्रिय कारभारावर जोरदार टीका केली.

यावेळी ग्रामस्थांनी आणखी एक उपरोधिक सवाल उपस्थित केला. "या मार्गावरून रोज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी प्रवास करतात. तरीही त्यांना रस्त्यावरचे खड्डे आणि जनतेचा होणारा त्रास कसा दिसत नाही?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवले.

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाबळेश्वर नगर परिषद आणि संबंधित प्रशासनाकडे संपूर्ण रस्त्याची तातडीने दुरुस्ती, सर्व खड्डे कायमस्वरूपी बुजविणे, आवश्यक ठिकाणी डिव्हायडर व साईडपट्ट्यांची उभारणी तसेच पावसाळ्यापूर्वी दर्जेदार आणि टिकाऊ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात मेटतळेचे सरपंच विठ्ठल रामचंद्र शिंगरे, संत रोहिदास समाज फाउंडेशनचे अध्यक्ष संपत धोंडिबा कदम, ज्येष्ठ समाजसेवक भाऊ शिंगरे, शिवसैनिक दिलीप शंकर जाधव, राजू रेवणे, भाऊ बोराणे, तुकाराम शिंगरे, सुरेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची सध्या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून, प्रशासन याची कितपत दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl