'समस्या दारातच जाणून घेतल्या'; माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांची मालुसर गावाला भेट, अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
'समस्या दारातच जाणून घेतल्या'; माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांची मालुसर गावाला भेट, अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
महाबळेश्वर, दि. २३ (प्रतिनिधी):
महाबळेश्वर तालुक्याचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला असून, गुरुवारी त्यांनी मालुसर गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी संबंधित शासकीय अधिकारीही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
गावभेटीदरम्यान ग्रामस्थांनी रस्त्यांची दुरवस्था, मोऱ्यांची आवश्यकता, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. संजूबाबा गायकवाड यांनी प्रत्येक समस्या काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने नोंदवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी गावातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. विशेषतः रस्ते, मोऱ्या व इतर विकासकामांची आवश्यकता असलेल्या ठिकाणांची पाहणी करून प्राधान्याने प्रस्ताव तयार करून आवश्यक ती कामे मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांनीही आपल्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी अशा प्रकारच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे प्रश्न सोडविण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मालुसर गावाच्या वतीने माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच गावातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment