महाबळेश्वरमध्ये पावसाचे पुनरागमन; २४ तासांत १०१.९० मि.मी. पावसाची नोंद, भातलावणीला दिलासा
महाबळेश्वरमध्ये पावसाचे पुनरागमन; २४ तासांत १०१.९० मि.मी. पावसाची नोंद, भातलावणीला दिलासा
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
महाबळेश्वरमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत १०१.९० मि.मी. (४.०१२ इंच) पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान २७१५.७० मि.मी. (१०६.९१७ इंच) इतके झाले आहे.
काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भातलावणीच्या कामांवर परिणाम झाला होता. मात्र, आता पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, भातलावणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
गेल्या वर्षी १८ जुलै २०२५ रोजी याच दिवशी केवळ १४.६० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक असून, हंगामातील एकूण पर्जन्यमानही गतवर्षीपेक्षा पुढे गेले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाबळेश्वर परिसर दाट धुक्याच्या चादरीत लपेटला गेला आहे. वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, आर्थर सीट आणि इतर पर्यटनस्थळांवर निसर्गाने मनमोहक रूप धारण केले असून, पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे.
तथापि, दाट धुके आणि सततच्या पावसामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच घाटमार्गावर सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment