५५ लाखांचा निधी मंजूर; तरीही दुधगाव आरोग्य उपकेंद्राचे काम रखडलेदुर्गम भागातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी प्रशासनाचा खेळ?

५५ लाखांचा निधी मंजूर; तरीही दुधगाव आरोग्य उपकेंद्राचे काम रखडले
दुर्गम भागातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी प्रशासनाचा खेळ?

प्रतापगड प्रतिनिधी : 

महाबळेश्वरसारख्या अतिपावसाळी आणि दुर्गम भागातील ग्रामीण नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. दुधगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी तब्बल ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल १५ महिने उलटून गेले, मात्र अद्याप या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये दुधगाव येथील आरोग्य उपकेंद्रासाठी शासनाने ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र प्रशासकीय अनास्था, दिरंगाई आणि संबंधित विभागांच्या उदासीन भूमिकेमुळे या प्रकल्पाची एक वीटदेखील अद्याप रचली गेलेली नाही. परिणामी, मंजूर निधी असूनही आरोग्य उपकेंद्राचे स्वप्न केवळ कागदोपत्रीच राहिले आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावे ही डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली असून पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था अनेकदा विस्कळीत होते. अशा परिस्थितीत गंभीर रुग्ण, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक तसेच अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय किंवा इतर दूरच्या आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. रस्त्यांची अवस्था, मुसळधार पाऊस आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवावर होण्याची शक्यता निर्माण होते.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या मते, शासनाकडून निधी मंजूर होणे ही सकारात्मक बाब असली तरी त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू न होणे ही प्रशासनाची गंभीर अपयशाची बाब आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला मूलभूत आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण जनतेला आजही संघर्ष करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

"घरातील व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालय गाठण्यापर्यंतच्या प्रवासात अजून किती जणांना जीव गमवावा लागणार?" असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोग्य सुविधा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असताना दुधगाव उपकेंद्राच्या कामातील दिरंगाईमुळे हा अधिकारच हिरावला जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, मंजूर झालेला ५५ लाख रुपयांचा निधी अद्याप शासकीय तिजोरीतच पडून असल्याची चर्चा असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. दुधगाव आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मंत्री मकरंदआबा पाटील यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे, अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थ आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl