मुसळधार पावसामुळे नावळी गावावर भू-स्खलनाचे सावट; जमीन खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुसळधार पावसामुळे नावळी गावावर भू-स्खलनाचे सावट; जमीन खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महाबळेश्वर प्रतिनिधी :
(इमेज काल्पनिक आहे)
महाबळेश्वरच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे धरणे, नद्या आणि जलस्रोत तुडुंब भरत असताना दुसरीकडे डोंगराळ भागातील गावांसमोर गंभीर संकट उभे राहू लागले आहे. गेल्या चोवीस तासांत महाबळेश्वर तालुक्यात तब्बल २५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने अनेक भागांमध्ये भू-स्खलन, जमीन खचणे आणि रस्त्यांवर भेगा पडण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामध्ये महाबळेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या नावळी गावाची परिस्थिती विशेष चिंताजनक बनली आहे.
गेल्या काही तासांपासून नावळी गावातील शेतजमिनी, घरांच्या परिसरातील माती तसेच गावातील काही रस्त्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खचण्यास सुरुवात झाली आहे. शेकडो एकर परिसरातील जमीन खचल्याचे चित्र समोर येत असून त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने डोंगराचा आधार कमकुवत होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे गावातील पाण्याच्या टाकीच्या खालच्या भागातही मोठ्या प्रमाणावर जमीन सरकल्याचे आणि भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. जर ही प्रक्रिया अशाच प्रकारे सुरू राहिली तर पाण्याची टाकी कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारची घटना घडल्यास खालच्या वस्तीला मोठा फटका बसण्याची शक्यता असून संभाव्य दुर्घटनेची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
गावातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून भू-तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करावे, धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करावे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे. यापूर्वी राज्यात अतिवृष्टीमुळे घडलेल्या मोठ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणताही धोका पत्करू नये, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, नावळी गावापुरतीच ही समस्या मर्यादित नसून महाबळेश्वर तालुक्यातील इतर अनेक गावांच्या रस्त्यांवर आणि डोंगर उतारांवरही भेगा पडल्याच्या घटना समोर येत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगण्याबरोबरच नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळावा आणि धोकादायक भागांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment