महाबळेश्वर पालिकेचा मोठा निर्णय!
महाबळेश्वर पालिकेचा मोठा निर्णय!
स्वच्छतेचा ₹११.२५ कोटींचा ठेका रद्द; अकार्यक्षमतेवर प्रशासनाचा दणका
व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस कंपनीला हटविण्याचा सर्वानुमते निर्णय; पाणीदरवाढीसाठी विशेष सभा, विकासकामांनाही हिरवा कंदील
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या स्वच्छतेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे दीड वर्षापूर्वी व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेला ₹११ कोटी २५ लाख १७ हजार ७७५ रुपयांचा स्वच्छतेचा ठेका रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठेकेदार कंपनीच्या सातत्याने होत असलेल्या अकार्यक्षम कामकाजामुळे शहराच्या स्वच्छतेचा दर्जा खालावल्याची तीव्र नाराजी सभेत व्यक्त करण्यात आली.
नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेत स्वच्छता सभापती ॲड. संजय जंगम यांनी ठेकेदार कंपनीने करारातील अटींचे प्रभावी पालन न केल्यामुळे शहरातील स्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयाचे विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांच्यासह विरोधी गटानेही स्वागत करत प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
सोमवारी दुपारी १ वाजता सुरू झालेली सर्वसाधारण सभा विविध विषयांवरील सखोल चर्चेनंतर रात्री ८ वाजता संपली. या कालावधीत शहर विकास, शिक्षण, पाणीपुरवठा, अतिक्रमण, भूमिगत सुविधा आणि विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
पाणीदरवाढीवर विशेष सभेचा निर्णय
सभेतील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरवाढीचा होता. प्राधिकरणाने घाऊक पाणीपुरवठ्याचे दर वाढविल्याने पालिकेवर दरमहा सुमारे ₹३ ते ₹३.५ लाखांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा खर्च सुमारे ₹१३-१४ लाखांवरून ₹१६-१७ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या पाणीदरात वाढ करण्याचा विषय सभेत चर्चेला आला. मात्र या संवेदनशील विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र विशेष सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पालिकेकडे असलेली ₹१७ कोटींहून अधिक थकबाकी आणि त्यामुळे वेळोवेळी पाणीपुरवठा खंडित होण्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती नासिर मुलाणी यांनी या प्रश्नावर सर्वांनी एकत्रित येऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. नगरसेवक संतोष शिंदे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.
विकासकामांसह अनेक विषयांना मंजुरी
सभेत शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांनाही मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये पालिका शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्योत्तर मुदतवाढ, मुख्याध्यापक व प्राचार्य नियुक्त्या, पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र वितरण, कारवी आळी येथे भूमिगत ड्रेनेज लाईन उभारणे, २०११ पर्यंतच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबतचा निर्णय, पालिका हद्दीत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नव्या विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.
याशिवाय छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ ठेका पद्धतीने चालविण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र संबंधित ठेकेदाराला स्वच्छता राखणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आदी अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.
सभेला उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, मुख्य लिपिक बबन जाधव, सभा अधीक्षक अमित माने तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बॉक्स न्यूज
महत्त्वाचे निर्णय एका नजरेत
- ₹११.२५ कोटींचा स्वच्छतेचा ठेका रद्द.
- व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस कंपनीवर अकार्यक्षमतेची कारवाई.
- पाणीदरवाढीवर निर्णयासाठी विशेष सभा बोलावणार.
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ₹१७ कोटींपेक्षा अधिक थकबाकी चर्चेत.
- कारवी आळी येथे भूमिगत ड्रेनेजला मंजुरी.
- पालिका कर्मचारी गणवेश व ओळखपत्रांना मंजुरी.
- २०११ पर्यंतच्या निवासी अतिक्रमण नियमितीकरणाचा विषय मंजूर.
- छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ ठेका पद्धतीने चालविण्याचा निर्णय.
Comments
Post a Comment