संकटाच्या काळात घटनास्थळी धाव! दरडग्रस्त मुंबई–पुणे मिसिंग लिंक परिसराची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून मध्यरात्री पाहणी
संकटाच्या काळात घटनास्थळी धाव! दरडग्रस्त मुंबई–पुणे मिसिंग लिंक परिसराची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून मध्यरात्री पाहणी
मुंबई प्रतिनिधी :
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर मंत्री भोसले यांनी दरड कोसळलेल्या भागाची बारकाईने पाहणी केली. वाहतुकीवर होणारा परिणाम, दरडीमुळे निर्माण झालेला धोका आणि पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसाचा जोर कायम असल्याने बचाव आणि सुरक्षेच्या कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, तसेच नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने सतत सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी संबंधित विभागातील अधिकारी, अभियंते आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी सुरू असलेल्या कामांची माहिती मंत्र्यांना दिली. दरड हटविणे, वाहतूक सुरळीत करणे आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यरत करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत प्रशासनाने सातत्याने दक्ष राहावे, असे निर्देशही मंत्री भोसले यांनी दिले.
सार्वजनिक पद हे केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे कर्तव्य असल्याची प्रचिती त्यांच्या या पाहणीतून पुन्हा एकदा आली. रात्रीच्या वेळी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला दिशा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही त्यांची कार्यपद्धती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ निर्णयक्षमता, विकासकामांबाबतची जबाबदारी आणि जनतेच्या सुरक्षिततेप्रती असलेली संवेदनशीलता यांचा संगम या पाहणीतून दिसून आला. त्यामुळे संकटाच्या क्षणी प्रशासन आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या तत्पर भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment