मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई! अनेक भाग जलमय; भांडुपमध्ये रस्ता खचल्याने खळबळ
मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई! अनेक भाग जलमय; भांडुपमध्ये रस्ता खचल्याने खळबळ
✍️महेंद्र कारंडे
मुंबई प्रतिनिधी :
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अंधेरी सबवे, हिंदमाता, दादर, परळ, वर्ली, वडाळा, बांद्रा-कुर्ला संकुल, पवई, विक्रोळी आणि भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही ठिकाणी रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.
दरम्यान, भांडुप परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. एलबीएस मार्गावरील एका ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग अचानक खचल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत एक वाहन खड्ड्यात अडकल्याची माहिती समोर आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित करून दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.
याशिवाय, भांडुप परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या. जोरदार वारे आणि सततच्या पावसामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने कारवाई करत झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment