सोळशी विभागातील पूरग्रस्त गावांना अजित सपकाळ यांची भेट; नुकसानग्रस्तांना भरीव निधीचे आश्वासन, महाबळेश्वर–येरणे एसटी सेवा पुन्हा सुरू
सोळशी विभागातील पूरग्रस्त गावांना अजित सपकाळ यांची भेट; नुकसानग्रस्तांना भरीव निधीचे आश्वासन, महाबळेश्वर–येरणे एसटी सेवा पुन्हा सुरू
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सलग पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोळशी विभागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ यांनी येरणे बुद्रुक, येरणे खुर्द, आचली आणि सौंदरी या पूरग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
मुसळधार पावसामुळे नदीकाठची अनेक शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नदीकाठची धूप रोखण्यासाठी संरक्षण बंधारे उभारावेत, अशी मागणी ग्रामस्थ संतोष घाडगे यांनी यावेळी केली.
याशिवाय अतिवृष्टीमुळे बंद झालेली महाबळेश्वर–येरणे एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेण्यात आली असून आजपासून महाबळेश्वर–येरणे एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे कुरोशी मोरी आणि सौंदरी मोरी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे कुरोशी–येरणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अजित सपकाळ यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित ठिकाणी तात्पुरता भराव टाकण्यात आला असून कुरोशी ते येरणे हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना अजित सपकाळ यांनी नुकसानग्रस्त गावांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोळशी विभागातील नुकसानग्रस्त गावांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, मोऱ्या आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संरक्षण बंधारे उभारणे, मोऱ्यांची पुनर्बांधणी, रस्त्यांची दुरुस्ती तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment