अडथळ्यांची शर्यत! महाबळेश्वर–तापोळा मार्गावर झाड कोसळले, झोळाची खिंड येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद; एसटीसह अनेक वाहने अडकली, प्रवाशांचे हाल
अडथळ्यांची शर्यत! महाबळेश्वर–तापोळा मार्गावर झाड कोसळले, झोळाची खिंड येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद; एसटीसह अनेक वाहने अडकली, प्रवाशांचे हाल
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कारवी आळा येथे भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. या अडथळ्यामुळे वाहने थांबलेली असतानाच पुढे झोळाची खिंड येथे मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे या मार्गावर अक्षरशः अडथळ्यांची शर्यतच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रस्ता बंद झाल्यामुळे तेटली मुक्काम आणि येरणे मुक्काम या एसटी बसांसह अनेक खासगी वाहने दोन्ही बाजूंना अडकून पडली. दीर्घकाळ वाहतूक ठप्प राहिल्याने बसमधील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अनेक प्रवासी तासन्तास रस्त्यावर अडकून राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती दिली. मात्र, बराच वेळ कोणतीही यंत्रणा किंवा अवजड यंत्रसामग्री घटनास्थळी उपलब्ध न झाल्याने रस्ता मोकळा करण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात आणखी झाडे कोसळण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
महाबळेश्वर–तापोळा हा पर्यटन आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा आणि आवश्यक अवजड साधने उपलब्ध ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment