रानगव्यांचा धुमाकूळ; शिंदी-वलवण परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचा संताप
रानगव्यांचा धुमाकूळ; शिंदी-वलवण परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचा संताप
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी व वळवण परिसरात रानगव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शिंदी येथील शेतकरी विनोद जयसिंग मोरे यांच्या भातशेतीत रानगव्यांनी शिरकाव करून उभ्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या भातपिकाच्या वाढीचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. या काळात पिकांची योग्य वाढ होणे अपेक्षित असताना रात्रीच्या वेळी रानगव्यांचे कळप शेतात घुसून भाताचे पीक तुडवून टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरत आहे. वाढते उत्पादन खर्च, मजुरी आणि नैसर्गिक संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठे संकट बनला आहे.
शिंदी, वळवण आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रानगव्यांचा वावर वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीसह इतर पिकांचेही नुकसान होत असून, वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी वेळेवर पोहोचत नसल्याने पंचनामे लांबणीवर पडत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय, कृषी विभागानेही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती तपासावी आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
नुकसानग्रस्त शेतकरी विनोद जयसिंग मोरे यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच शिंदी-वलवण परिसरात रानगव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, संरक्षण कुंपण, गस्त वाढविणे आणि वन्यप्राण्यांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिंदी व वळवण परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन वन विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवावे, पंचनामे करून नुकसानभरपाई मंजूर करावी आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
Comments
Post a Comment