कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना ₹१३,३३६ कोटींचा दिलासा
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना ₹१३,३३६ कोटींचा दिलासा
मुंबई प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, राज्यातील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण ₹१३,३३६ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, ही फक्त पहिली यादी असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांचे नाव सध्या जाहीर झालेल्या यादीत नाही, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील ७.०३ लाख आणि व्यापारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांतील ९.९३ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने ₹१३,३३६ कोटींची तरतूद केली आहे.
पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची पुढील कार्यवाही केली जाणार असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
योजनेबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास संबंधित जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी शासनाने ०२२-४९१५०८०२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून, कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून, शेतीसाठी नव्याने उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर आणखी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Comments
Post a Comment