पेरले हद्दीत मध्यरात्री थरारक गोळीबार; आर्थिक वादातून मित्रावर गोळ्या झाडल्या, एक गंभीर जखमी
कराड, प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील उंब्रजजवळील इंदोली फाट्यानजिक पेरले गावाच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मित्रांमधील आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत एका तरुणाला दोन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, काही मित्र मध्यरात्री एकत्र आले असताना त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अचानक विकोपाला गेला. संतापाच्या भरात एका व्यक्तीने जवळील पिस्तूल काढून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या वेळी चार ते पाच राऊंड गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबारात एका तरुणाला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी तत्काळ त्याला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटण विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदाम पाचोरे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून गोळीबारात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा तसेच गोळीबार करणाऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
गोळीबारामागील नेमके कारण, घटनेत सहभागी व्यक्तींची संख्या, आर्थिक व्यवहाराचे स्वरूप आणि हल्लेखोरांची ओळख याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.
या थरारक घटनेमुळे पेरले, इंदोली फाटा आणि उंब्रज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment