आषाढी एकादशी निमित्त संतभूमी निपाणीत विठ्ठलभक्तीचा महासोहळा; अभिषेक, दिंडी, भजन, प्रवचन व हरिपाठाने दुमदुमणार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
आषाढी एकादशी निमित्त संतभूमी निपाणीत विठ्ठलभक्तीचा महासोहळा; अभिषेक, दिंडी, भजन, प्रवचन व हरिपाठाने दुमदुमणार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
तापोळा प्रतिनिधी :
वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतभूमी निपाणी येथे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वै. ह.भ.प. हरिभाऊ गुरुजी यांच्या पवित्र आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळ निपाणी यांच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवसभर विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जाणार आहे.
आषाढी एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. त्याच भक्तीभावाचा अनुभव निपाणीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही भाविकांना घेता यावा, यासाठी दिवसभर अभिषेक, भजन, महाआरती, दिंडी सोहळा, प्रवचन, हरिपाठ तसेच भाविकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटेच्या मंगलमय वातावरणात अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात भजन व दिंडी सोहळा रंगणार आहे. वारकरी पारंपरिक वेशभूषेत विठ्ठलनामाचा अखंड गजर करत दिंडीत सहभागी होणार असून, संपूर्ण निपाणी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. सायंकाळी होणारे प्रवचन आणि हरिपाठ भक्तांच्या अध्यात्मिक चिंतनाला नवी ऊर्जा देणार आहेत.
"माझ्या जीवीची आषाढी, पंढरपुरा नेईन गुढी" आणि "पंढरीशी जा रे आळ्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग" या अभंगांच्या सुरावटीत विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
- सकाळी ५.०० ते ६.०० – अभिषेक
- सकाळी ७.०० ते ९.०० – भजन
- सकाळी ९.०० ते १०.०० – महाआरती
- सकाळी १०.०० ते दुपारी १.०० – दिंडी सोहळा
- दुपारी १.०० ते २.०० – अल्पोपहार वाटप
- दुपारी २.०० ते ५.०० – भजन
- सायंकाळी ५.०० ते ६.०० – प्रवचन
- सायंकाळी ६.०० ते ८.०० – हरिपाठ
या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ मंडळ निपाणी, संत मुक्ताबाई महिला मंडळ निपाणी आणि संत सखुबाई महिला मंडळ निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. निपाणीसह पंचक्रोशीतील सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन घ्यावे, नामस्मरणाचा लाभ घ्यावा आणि या मंगलमय धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे प्रेमळ आवाहन आयोजकांनी केले आहे.
"राम कृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!" या अखंड नामघोषात निपाणी नगरी पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे.
Comments
Post a Comment