अडथळ्यांची शर्यत संपवली! महाबळेश्वर–तापोळा मार्गावर झाड, दरड अन् मुसळधार पावसाचे संकट; स्थानिक नागरिक व शिवसेना नेते सुभाष कारंडे यांच्या प्रयत्नांनी मध्यरात्री मार्ग खुला
अडथळ्यांची शर्यत संपवली! महाबळेश्वर–तापोळा मार्गावर झाड, दरड अन् मुसळधार पावसाचे संकट; स्थानिक नागरिक व शिवसेना नेते सुभाष कारंडे यांच्या प्रयत्नांनी मध्यरात्री मार्ग खुला
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर–तापोळा मार्गावर सोमवारी संध्याकाळी मोठा वाहतूक खोळंबा निर्माण झाला. कारवीआळा परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अडथळ्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाच पुढे झोळाची खिंड येथे मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने मार्ग पूर्णतः बंद झाला. त्यामुळे या मार्गावर अक्षरशः अडथळ्यांची शर्यतच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रस्ता बंद झाल्यामुळे तेटली मुक्काम आणि येरणे मुक्काम या एसटी बसांसह अनेक खासगी वाहने दोन्ही बाजूंना अडकून पडली. अनेक प्रवाशांना तासन्तास रस्त्यावरच थांबावे लागले. बसमधील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. रात्रीपर्यंत वाहतूक सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच कारवीआळा परिसरातील स्थानिक नागरिकांनी कोणतीही वाट न पाहता पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रयत्नांतून रस्त्यावर कोसळलेले झाड हटवून त्यांनी वाहतुकीसाठी मार्ग खुला केला. मात्र, पुढे झोळाची खिंड येथे दरड कोसळल्याने वाहने पुन्हा अडकली आणि वाहतूक पूर्णपणे बंद राहिली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाला याबाबत तातडीने माहिती दिली. मात्र, बराच वेळ कोणतीही यंत्रणा किंवा अवजड यंत्रसामग्री घटनास्थळी न पोहोचल्याने रस्ता मोकळा करण्यास विलंब झाला. परिणामी, प्रवाशांचे हाल अधिकच वाढले.
अखेर शिवसेना नेते सुभाष कारंडे यांनी स्वतः पुढाकार घेत रात्री सुमारे अकरा वाजता झोळाची खिंड येथे पोहोचून मुसळधार पावसात जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले. प्रतिकूल हवामानातही ते घटनास्थळी ठामपणे उभे राहून कामावर लक्ष ठेवत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे दरड हटविण्यात यश आले आणि बंद झालेला महाबळेश्वर–तापोळा मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर अडकलेल्या एसटी बसांसह सर्व वाहनांना मार्गस्थ होता आले आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
महाबळेश्वर–तापोळा हा पर्यटन तसेच ग्रामीण भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून पावसाळ्यात या मार्गावर वारंवार झाडे कोसळणे, दरडी घसरणे आणि मातीचा ओसरा होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची छाटणी करावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी जेसीबीसह आवश्यक यंत्रसामग्री आणि कर्मचारी कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment