३५ ते ४० वर्षांचा वनवास संपणार कधी? दुधगाव आरोग्य उपकेंद्राची उभारणी अजूनही रखडली; नागरिकांमध्ये संताप
३५ ते ४० वर्षांचा वनवास संपणार कधी? दुधगाव आरोग्य उपकेंद्राची उभारणी अजूनही रखडली; नागरिकांमध्ये संताप
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गेली तीन ते चार दशके सुरू असलेली दुधगाव आरोग्य उपकेंद्राची मागणी आजही अपूर्णच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून उपकेंद्रासाठी मंजुरी आणि निधी उपलब्ध होऊन तब्बल पंधरा महिने उलटून गेले असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दुधगाव परिसरातील ग्रामस्थांनी मेटगुताड येथील आरोग्य उपकेंद्र स्थलांतरित करून ते दुधगाव येथे उभारण्याची मागणी जवळपास ३५ ते ४० वर्षांपासून सातत्याने केली आहे. या मागणीसाठी अनेक निवेदने, पाठपुरावे आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाने उपकेंद्रास मंजुरी देत निधीही उपलब्ध करून दिला. मात्र, मंजुरीनंतरही काम प्रत्यक्षात सुरू न झाल्याने ग्रामस्थांच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाल्या आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, निधी उपलब्ध असूनही बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम रखडले आहे. अनेक वर्षांपासून फाईल लालफितीत अडकून राहिल्याने या भागातील नागरिकांना आजही आरोग्य सेवेसाठी महाबळेश्वर, पाचगणी, वाई किंवा सातारा येथे धाव घ्यावी लागते. विशेषतः पावसाळ्यात रस्ते बंद होणे, पूल वाहून जाणे किंवा संपर्क तुटणे अशा परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत कठीण बनते.
दुधगावसह झांजवड, चतूरबेट, गोरोशी, घोणसपूर, देवळी, कळमगाव, शिरवली आणि परिसरातील अनेक गावांतील हजारो नागरिक या उपकेंद्रावर अवलंबून राहणार आहेत. मात्र, आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आपत्कालीन रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे शासन आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाचे दावे करत असताना दुसरीकडे दुर्गम भागातील नागरिकांना एका साध्या आरोग्य उपकेंद्रासाठी अनेक दशके संघर्ष करावा लागत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते अनंत शंकर जाधव यांनी व्यक्त केली आहे. विकासकामांमध्ये मोठे प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होत असताना अत्यावश्यक आरोग्य सुविधेसाठी इतका विलंब होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणे अधिकच अवघड होणार आहे. त्यामुळे शासन आणि संबंधित प्रशासनाने दुधगाव आरोग्य उपकेंद्राच्या उभारणीचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, उपकेंद्राच्या उभारणीबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून रखडलेले काम मार्गी लावावे, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment