महाबळेश्वरच्या सामाजिक व सहकार क्षेत्रावर शोककळा; अर्बन बँक महाबळेश्वर चे माजी चेअरमन, बाळासाहेब कोंढाळकर यांचे निधन
महाबळेश्वरच्या सामाजिक व सहकार क्षेत्रावर शोककळा; अर्बन बँक महाबळेश्वर चे माजी चेअरमन, बाळासाहेब कोंढाळकर यांचे निधन
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वरच्या सामाजिक, सहकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व तथा अर्बन बँक महाबळेश्वरचे माजी चेअरमन बाळासाहेब कोंढाळकर यांचे निधन झाल्याने महाबळेश्वर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बाळासाहेब कोंढाळकर हे श्री छत्रपती मराठा संघ तसेच जय भवानी मित्र मंडळाचे सक्रिय सदस्य होते. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग राहिला असून सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते. अर्बन बँक महाबळेश्वरचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडताना अनेक विकासाभिमुख उपक्रम राबविले. त्यांच्या शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
त्यांच्या निधनामुळे कोंढाळकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून श्री छत्रपती मराठा संघ, सिद्धीविनायक मंदिर महाबळेश्वर तसेच जय भवानी मित्र मंडळाने शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. विविध सामाजिक संस्था, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडूनही त्यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
बाळासाहेब कोंढाळकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता महाबळेश्वर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनाने महाबळेश्वरच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment