महाबळेश्वरात विकासकामांचा बोजवारा! ठेकेदार गायब, कामगार फरार; चार चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये पाणी, नागरिकांचा संताप
महाबळेश्वरात विकासकामांचा बोजवारा! ठेकेदार गायब, कामगार फरार; चार चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये पाणी, नागरिकांचा संताप
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरातील स्कूल मोहल्ला परिसरात सुरू असलेल्या विकासकामांतील गंभीर निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अपूर्ण अवस्थेत सोडलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे विस्कळीत झाला असून चार चेंबर्स ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी परिसरातील दोन ते तीन घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील विविध भागांतील पावसाचे पाणी स्कूल मोहल्ला परिसरात येऊन साचत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सुरू असलेले विकासकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काल संबंधित अधिकारी आणि काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर समस्या सोडविण्यात आल्याचा आणि काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अवघ्या एका तासातच हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. आज परिस्थिती आणखी गंभीर झाली असून चारही चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले आहे.
या प्रकारामुळे परिसरातील दोन ते तीन घरांमध्ये पाणी शिरले असून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याहून गंभीर बाब म्हणजे आज घटनास्थळी काम सुरू करण्यासाठी एकही मजूर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. संबंधित ठेकेदार किंवा त्याचा प्रतिनिधीही घटनास्थळी फिरकला नसल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून प्रशासनाकडून याबाबत कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
"केवळ पाहणी करून आश्वासने देण्यात काही अर्थ नाही. प्रत्यक्षात काम पूर्ण होणे आणि नागरिकांना दिलासा मिळणे महत्त्वाचे आहे," अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अपूर्ण विकासकाम त्वरित पूर्ण करावे, ओव्हरफ्लो होणाऱ्या चेंबर्सची दुरुस्ती करून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या समस्येकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक बनले असून, अन्यथा पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment