महाबळेश्वर ट्रेकर्सच्या बचावकार्याला नवे बळ! अत्याधुनिक रबर बोटीचे वेण्णा तलावात दिमाखात लोकार्पणआषाढी वारीसाठी रेस्क्यू टीम सज्ज; आपत्ती व्यवस्थापनाला मिळणार अधिक गती
महाबळेश्वर ट्रेकर्सच्या बचावकार्याला नवे बळ! अत्याधुनिक रबर बोटीचे वेण्णा तलावात दिमाखात लोकार्पण
आषाढी वारीसाठी रेस्क्यू टीम सज्ज; आपत्ती व्यवस्थापनाला मिळणार अधिक गती
महाबळेश्वर (प्रतिनिधी) :
"आघातातून आधाराकडे" या ब्रीदवाक्याला प्रत्यक्षात उतरवत गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे बचावकार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्स या संस्थेच्या ताफ्यात आता एका अत्याधुनिक साधनाची भर पडली आहे. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने संस्थेला अत्याधुनिक रबर बोट आणि ओबीएम (आउटबोर्ड मोटर) मशीन प्रदान करण्यात आले असून, या नव्या बोटीचे लोकार्पण रविवारी वेण्णा तलाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
जीवितरक्षणासाठी सज्ज अत्याधुनिक बोट
पूरपरिस्थिती, जलप्रलय किंवा जलस्त्रोतांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचे प्राण वाचवणे, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच अत्यावश्यक मदत सामग्री जलदगतीने पोहोचवणे यासाठी ही रबर बोट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी वेण्णा तलावात सुमारे दोन तास सराव करत बोटीच्या कार्यक्षमतेची प्रत्यक्ष चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी ठरली.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष सतर्कता
येत्या १५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यादरम्यान निरा नदीत पादुकांचे स्नान घालण्याची परंपरा असून, हजारो भाविक आणि वारकरी याच काळात नदीपात्रात स्नानासाठी मोठ्या संख्येने उतरतात. ही गर्दी लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंदाही महाबळेश्वर ट्रेकर्सच्या रेस्क्यू टीमची विशेष नियुक्ती केली आहे.
या रेस्क्यू टीमचे १० प्रशिक्षित सदस्य निरा नदी परिसरात बचावकार्यासाठी सज्ज राहणार असून, नव्याने मिळालेल्या रबर बोट आणि ओबीएम मशीनमुळे बचावकार्य अधिक गतिमान व परिणामकारक होणार आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
गौरवशाली सेवेचा वारसा
महाबळेश्वर ट्रेकर्सने गेल्या अनेक वर्षांत पूर, दरडी कोसळणे, अपघात आणि विविध नैसर्गिक संकटांच्या वेळी शेकडो नागरिकांचे प्राण वाचवून आपली सेवाभावी ओळख सिद्ध केली आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या अत्याधुनिक साधनांमुळे संस्थेची बचावक्षमता अधिक बळकट झाली असून, भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ट्रेकर्सची टीम आता अधिक सक्षम व सज्ज झाली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य तथा नगरसेवक कुमार शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख देविदास ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. परजाने, पालिकेचे बोट क्लब अधीक्षक कल्याण हिवरे, ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे यांच्यासह जयवंत बिरामणे, अमित कोळी, सोमनाथ वागदरे, अक्षय नाविलकर, अनिकेत वागदरे, प्रज्वल केळगणे, आशिष बिरामणे तसेच पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment