संकटात ग्रामस्थांची धाडसी एकजूट! बिरमणीचा संपर्क तुटला; पुलाला अडकलेले प्रचंड ओंडके हटवून संभाव्य अनर्थ टाळला
संकटात ग्रामस्थांची धाडसी एकजूट! बिरमणीचा संपर्क तुटला; पुलाला अडकलेले प्रचंड ओंडके हटवून संभाव्य अनर्थ टाळला
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दुर्गम भागांनाही बसला असून बिरमणी गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सततच्या पावसामुळे नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्यासोबत मोठमोठे लाकडी ओंडके वाहत येऊन गावाच्या पुलाच्या कठड्यांना अडकले. त्यामुळे पुलावर मोठा ताण निर्माण होऊन त्याचे नुकसान होण्याचा तसेच संपर्क पूर्णपणे खंडित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र गावातील सजग आणि धाडसी नागरिकांनी वेळेचे गांभीर्य ओळखत तातडीने पुढाकार घेत पुलाला अडकलेले प्रचंड ओंडके हटवून संभाव्य मोठी दुर्घटना टाळली.
पुराच्या वेगामुळे पुलाच्या कठड्यांवर मोठ्या प्रमाणात लाकडी ओंडके साचल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला होता. त्यामुळे पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला होता. परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी ग्रामस्थांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले. मोठ्या मेहनतीने आणि धाडसाने त्यांनी पुलाला अडकलेले ओंडके हटवत पाण्याचा प्रवाह सुरळीत केला. त्यामुळे पुलावरील ताण कमी होऊन संभाव्य मोठे नुकसान टळले.
या धाडसी कार्यात श्रीरंग मोरे, अनिल घाडगे, प्रदीप मोरे, भागोजी मोरे, मनोहर घाडगे आणि प्रकाश मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. जीवाची पर्वा न करता त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गावाचा महत्त्वाचा पूल सुरक्षित राहण्यास मदत झाली. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून संकटसमयी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे बिरमणी गावाचा संपर्क अद्यापही विस्कळीत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलाची सुरक्षितता तपासावी, संपर्क मार्ग पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment