मरीआई मंदिराजवळील खड्ड्यांनी वाढवला प्रवाशांचा त्रास; कुंभरोशी–जावली हद्दीतील रस्त्यावर वाहनांची रोजची आदळापट आंबेनळी घाटातील धोकादायक परिस्थिती कायम; मागील वर्षापासून खड्डे कायम असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांत संताप
मरीआई मंदिराजवळील खड्ड्यांनी वाढवला प्रवाशांचा त्रास; कुंभरोशी–जावली हद्दीतील रस्त्यावर वाहनांची रोजची आदळापट
आंबेनळी घाटातील धोकादायक परिस्थिती कायम; मागील वर्षापासून खड्डे कायम असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांत संताप
प्रतापगड प्रतिनिधी :
आंबेनळी घाटातील कुंभरोशी आणि जावली गावांच्या हद्दीवर असलेल्या मरीआई मंदिराजवळील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी निर्माण झालेल्या या मोठ्या खड्ड्यांमध्ये दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आदळापट होत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
विशेष म्हणजे सदर खड्डे मागील वर्षापासून अस्तित्वात असून पावसाळ्यापूर्वी त्यांची डागडुजी आणि आवश्यक दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र संबंधित प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी मागील पावसाळ्यात जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती यंदाही निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंबेनळी घाट हा महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. वर्षभर या मार्गावरून हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच मालवाहतूक करणारी वाहने प्रवास करत असतात. विशेषतः पावसाळ्यात महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत मरीआई मंदिराजवळील रस्त्यावर निर्माण झालेले मोठे खड्डे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहेत.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांची खोली आणि व्याप्ती लक्षात येत नाही. त्यामुळे अचानक वाहन खड्ड्यात गेल्याने वाहनांचे संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असून किरकोळ अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. चारचाकी वाहनांनाही या खड्ड्यांमधून जाताना मोठे धक्के बसत असून वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
आंबेनळी घाट हा दरडी कोसळणे, दाट धुके, खोल दऱ्या आणि अपघातांच्या घटनांमुळे आधीच संवेदनशील मानला जातो. त्यातच रस्त्यावरील खड्ड्यांनी आणखी भर पडली असून ही परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी असल्याची भावना स्थानिक नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करत आहेत.
स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून संबंधित विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे, रस्त्याची डागडुजी करण्याचे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून आंबेनळी घाटातील या धोकादायक ठिकाणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment