पार गावात दिवसाढवळ्या घरफोडीचा थरार; अंगणवाडी सेविकेच्या घरातून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

पार गावात दिवसाढवळ्या घरफोडीचा थरार; अंगणवाडी सेविकेच्या घरातून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील पार येथे दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी अंगणवाडी सेविकेच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुष्मा सुधाकर महामुनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुष्मा महामुनकर या गेली तेवीस वर्षे पार येथील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती कामानिमित्त सकाळी सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास प्रतापगड माची येथील हस्तकला केंद्रात कामासाठी गेले होते. त्यानंतर सुष्मा महामुनकर या देखील नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे १० वाजता घराला कुलूप लावून अंगणवाडीत गेल्या होत्या.

दुपारी सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्यानंतर त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तुटलेला असून कुलूप केवळ अडकवून ठेवलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना बोलावून घेतले आणि त्यानंतर घरात प्रवेश केला असता बेडरूममधील पत्र्याच्या कपाटाचे दार उचकटून आतील लॉकर फोडण्यात आल्याचे दिसून आले. लॉकरमधील दागिन्यांची पेटी तपासली असता त्यामधील सर्व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे एक तोळे वजनाचे व सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफुले व वेल तसेच अर्धा तोळे वजनाची सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी अशा एकूण दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा क्रमांक ६०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने करीत आहेत.

महाबळेश्वर परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl