महाबळेश्वर पावसात बुडाले, पालिकेची यंत्रणा मात्र ठप्प? ४८ तासांत ३६ इंच पाऊस; घरांत पाणी, रस्ते वाहून गेले, नागरिकांचा संताप




महाबळेश्वर पावसात बुडाले, पालिकेची यंत्रणा मात्र ठप्प? ४८ तासांत ३६ इंच पाऊस; घरांत पाणी, रस्ते वाहून गेले, नागरिकांचा संताप

महाबळेश्वर, प्रतिनिधी :


पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या मान्सूनने पुन्हा एकदा आपला रौद्रावतार दाखवला आहे. गेल्या ४८ तासांत तब्बल ३६ इंच पावसाची नोंद झाल्याने संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. महाबळेश्वरमध्ये पावसाची नोंद इतर ठिकाणांप्रमाणे मिलीमीटर किंवा सेंटीमीटरमध्ये नव्हे, तर इंचामध्ये केली जाते. यावरून येथील पावसाच्या तीव्रतेची सहज कल्पना येते.

या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शहरातील स्कूल मोहल्ला, नामदेव सोसायटी आणि अंबिका सोसायटी परिसराला बसला. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे तसेच ड्रेनेजचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. घरातील संसारोपयोगी साहित्य भिजले, तर अनेक कुटुंबांना रात्रभर जागून परिस्थितीचा सामना करावा लागला.

घटना घडल्यानंतर नगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत आपत्कालीन पाहणी केली. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही हालचाल केवळ काही तासांपुरतीच मर्यादित राहिली. सुरुवातीला काम सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले; मात्र त्यानंतर प्रत्यक्षात काम बंद पडले आणि अधिकारी व कर्मचारी पुन्हा फिरकलेच नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी चमकोगिरी करण्यापेक्षा प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना का केल्या नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्कूल मोहल्ल्यातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर होती. गल्ल्यांमधून इतक्या वेगाने पाणी वाहत होते की, गल्लीऐवजी एखादी नदीच वाहत असल्याचा भास निर्माण झाला होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वीस वर्षांपासून या भागातील हीच परिस्थिती असून, आजपर्यंत कोणताही कायमस्वरूपी उपाय करण्यात आलेला नाही. पावसाच्या पाण्याचा निचरा हा या परिसरातील सर्वात मोठा आणि कायमचा प्रश्न बनला आहे.

स्कूल मोहल्ल्यातून वाहणारे पाणी पुढे अंबिका आणि नामदेव सोसायटी परिसरात पोहोचल्याने तेथील परिस्थिती अधिकच बिकट झाली. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे सोसायटीकडे जाणारा डांबरी रस्ताच वाहून गेला. या ठिकाणी दुरुस्तीसाठी नगरपालिका प्रशासनाकडून कोणीही न आल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी स्वतः फावडे हाती घेत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली. तसेच पाण्याचा प्रवाह मोकळा होण्यासाठी स्वतःच मार्ग तयार केला. हे काम प्रत्यक्षात नगरपालिकेचे असताना नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागल्याने प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाबळेश्वरमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने मान्सूनपूर्व तयारी म्हणून मे महिन्यात गटारे स्वच्छ करणे, पाण्याचा निचरा सुरळीत राहील याची व्यवस्था करणे आणि आपत्कालीन नियोजन तयार ठेवणे अपेक्षित होते. मात्र या मूलभूत कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच यंदा ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी नगरपालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा आणि निधी असूनही त्याचा प्रभावी वापर होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

याशिवाय वेण्णा नदीपात्रातील वाढती अतिक्रमणे हीदेखील पूरस्थितीला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने मुसळधार पावसात पाणी तुंबण्याचे आणि पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रकार वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित अतिक्रमणांवर वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वरमध्ये दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असताना प्रशासनाने केवळ आपत्कालीन पाहण्या न करता दीर्घकालीन नियोजन, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आता वेण्णा नदीपात्रातील अतिक्रमणे, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि शहरातील आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत नगरपालिका नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण महाबळेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl