महाबळेश्वरमध्ये मतदार यादी पुनरीक्षणासाठी वॉर्ड सभा संपन्न; दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांच्या पडताळणीला वेग
महाबळेश्वरमध्ये मतदार यादी पुनरीक्षणासाठी वॉर्ड सभा संपन्न; दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांच्या पडताळणीला वेग
निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेंतर्गत १० प्रभागांतील १६ भागयाद्यांचे वाचन; लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
महाबळेश्वर प्रतिनिधी :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियान महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद क्षेत्रात वेगाने सुरू असून, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत नगरपरिषद हद्दीतील दुबार, मयत, स्थलांतरित आणि गैरहजर मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे.
या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या २४ जुलै २०२६ रोजीच्या निर्देशानुसार महाबळेश्वर नगरपरिषद क्षेत्रात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार २८ व २९ जुलै २०२६ रोजी नगरपरिषद क्षेत्रातील १० प्रभागांमध्ये या सभा पार पडल्या.
या वॉर्ड सभांमध्ये नगरपरिषद हद्दीतील १६ भागयाद्यांमधील संभाव्य गैरहजर, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची यादी केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखवली. संबंधित नावांबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी सूचना व हरकती नोंदविण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली.
सभांना संबंधित प्रभागांतील नगरसेवक, नगरसेविका, सर्व राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट (BLA), तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीरहित करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
या उपक्रमासाठी नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशासकीय स्तरावर मुख्याधिकारी योगेश पाटील, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहायक पर्यवेक्षक मंगेश माने तसेच सर्व केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पार पाडून पुनरीक्षण मोहिमेला गती दिली.
प्रशासनाने नागरिकांना मतदार यादीतील आपली माहिती तपासून आवश्यक असल्यास संबंधित केंद्रस्तरीय अधिकारी किंवा निवडणूक प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन केले आहे.
चौकट
मतदार यादी अचूक करण्यावर भर
- १० प्रभागांमध्ये वॉर्ड सभा आयोजित
- १६ भागयाद्यांतील संभाव्य दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची यादी वाचून दाखविण्यात आली.
- नागरिकांच्या सूचना व हरकतींची नोंद घेऊन पारदर्शक पुनरीक्षण प्रक्रियेला गती देण्यात आली.
Comments
Post a Comment