संरक्षक तालीमुळे वाचला येरणे खुर्द! सोळशी नदीचे पाणी गावात शिरण्यापासून रोखले; कायमस्वरूपी संरक्षण भिंतीच्या कामाला विलंबावर प्रश्नचिन्ह
संरक्षक तालीमुळे वाचला येरणे खुर्द! सोळशी नदीचे पाणी गावात शिरण्यापासून रोखले; कायमस्वरूपी संरक्षण भिंतीच्या कामाला विलंबावर प्रश्नचिन्ह
तापोळा : प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर येरणे खुर्द गावावरील मोठे संकट ऐनवेळी टळले. माजी पंचायत समिती सभापती संजय गायकवाड यांनी समयसूचकता दाखवत सोळशी नदीकाठी तातडीने दगडी संरक्षक ताली (बांध) उभारल्यामुळे नदीचे पाणी गावात घुसण्यापासून रोखले गेले. त्यामुळे संभाव्य मोठे आर्थिक नुकसान आणि जीवितहानी टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
येरणे खुर्द हे सोळशी नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक गाव आहे. २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या गावाला मोठा फटका बसला होता. समोरून वाहणारी सोळशी नदी आणि पाठीमागील डोंगर यामुळे गावावर दुहेरी संकट निर्माण झाले होते. त्यानंतर या भागासाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंतीची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
या प्रश्नासाठी माजी सभापती संजय गायकवाड यांनी तत्कालीन आमदार तथा विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सलग तीन वर्षे पाठपुरावा केला. त्यानंतर येरणे खुर्दसह परिसरातील अतिवृष्टीग्रस्त गावांसाठी संरक्षण भिंती मंजूर करण्यात आल्या. निधी मंजूर झाला, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आणि कार्यादेशही देण्यात आला. परिसरातील अनेक गावांमध्ये संरक्षण भिंतींची कामे पूर्ण झाली; मात्र येरणे खुर्द येथील संरक्षण भिंतीचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वी येरणे खुर्द मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थांनी ही बाब संजय गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. पुन्हा अतिवृष्टी झाल्यास गावाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. याची तातडीने दखल घेत गायकवाड यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कामगार आणि आवश्यक साहित्य पाठवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दगडी ताली उभारण्यात आली तसेच त्याला लोखंडी जाळी बसवून ज्या ठिकाणाहून नदीचे पाणी गावात शिरण्याची शक्यता होती, त्या ठिकाणी मजबूत बांध घालण्यात आला.
अलीकडील मुसळधार पावसात या तात्पुरत्या संरक्षणामुळे सोळशी नदीचे पाणी गावात घुसू शकले नाही. परिणामी गावाचे मोठे नुकसान आणि संभाव्य जीवितहानी टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मात्र, या घटनेनंतर कायमस्वरूपी संरक्षण भिंतीचे काम अद्याप का सुरू झाले नाही, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कार्यादेश असूनही काम रखडण्यामागे नेमके कारण काय, याची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
येरणे खुर्द येथील ग्रामस्थ राजेंद्र घाडगे-पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "पक्क्या संरक्षक भिंतीचे काम इतके दिवस का रखडले? यामागील अनास्थेला जबाबदार कोण, हे समोर यायला हवे. संजय गायकवाड यांच्या पुढाकारामुळे आज पाण्याला अडवणारा बांध उभा राहिला, पण सर्वसामान्य जनतेच्या संयमाचा बांध किती दिवस टिकणार? भविष्यात कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी कायमस्वरूपी संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करावे."
येरणे खुर्दमधील ही घटना प्रशासनासाठीही धोक्याची घंटा मानली जात असून, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी संरक्षणात्मक कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
Comments
Post a Comment