महाबळेश्वर–तापोळा मार्गाला भेगा; पर्यायी मांघर–तळदेव रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता प्रमुख दळणवळणाच्या मार्गांनाही बसू लागला आहे. महाबळेश्वर–तापोळा या मुख्य रस्त्याच्या साईडपट्टीला सुमारे ३० मीटर लांबीची मोठी भेग पडल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संरक्षक कामे हाती घेतली आहेत. दरम्यान, भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पर्यायी मांघर–तळदेव–तापोळा मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी पुढे आली आहे.
बुधवारी सकाळी महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील पालिकेच्या कारवी आळी येथील कचरा डेपोजवळ अचानक रस्त्याच्या कडेला मोठी भेग पडल्याचे निदर्शनास आले. अवघ्या दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या या रस्त्याला भेगा पडल्याने वाहनचालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तापोळा परिसराकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, उपअभियंता अजय देशपांडे आणि शाखा अभियंता शिवप्रसाद धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रस्त्याला अधिक धोका निर्माण होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
उपअभियंता अजय देशपांडे यांनी सांगितले की, पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या या भागावर कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. सध्या मात्र वाहतुकीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक ती कामे सुरू आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे तालुक्यात अन्य ठिकाणीही नुकसान झाले आहे. दुर्गम आढाळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच महाबळेश्वर बाजारपेठेतील मुख्य एल. सी. डिसुझा रस्त्यावर एका हॉटेलजवळ झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पर्यायी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
महाबळेश्वर–तापोळा मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे, झाडे पडणे किंवा वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडत असतात. अशा वेळी मांघर–तळदेव–तापोळा हा पर्यायी मार्ग नागरिकांसाठी आणि आपत्कालीन सेवांसाठी महत्त्वाचा ठरतो. यापूर्वीही अनेक वेळा मुख्य मार्ग बंद झाल्यानंतर या रस्त्याचा वापर करण्यात आला असून भविष्यातही अशा परिस्थितीत याच मार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे.
मात्र, या पर्यायी रस्त्याचीही अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याची मागणी मांघर गावचे सरपंच गणेश जाधव यांनी केली आहे.
याबाबत बोलताना सरपंच गणेश जाधव म्हणाले, "महाबळेश्वर–तापोळा मार्गावर वारंवार अडचणी निर्माण होतात. अशा वेळी मांघरमार्गे तळदेव आणि तापोळ्याकडे जाणारा पर्यायी रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य करावा. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग सक्षम असणे ही काळाची गरज आहे."
सततच्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांवरील धोके वाढत असून, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता मुख्य तसेच पर्यायी मार्गांचे दीर्घकालीन मजबुतीकरण करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment