आंबेनळी घाट बंद; एसटी सेवा ठप्प, खाजगी वाहनांची मनमानी! प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, नागरिकांची मागणी
आंबेनळी घाट बंद; एसटी सेवा ठप्प, खाजगी वाहनांची मनमानी! प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, नागरिकांची मागणी
प्रतापगड प्रतिनिधी :
रायगड जिल्हा प्रशासनाने आंबेनळी घाट मार्ग बंद असल्याचे जाहीर केल्यामुळे पोलादपूर–कुंभरोशी दरम्यान राज्य परिवहन (एसटी) बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गावर खाजगी वाहने, लहान-मोठी चारचाकी तसेच अवजड वाहने सुरळीतपणे धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने परिस्थितीचा फेरआढावा घेऊन तातडीने घाट मार्ग एसटी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, घाट बंद असल्याचा सर्वाधिक फटका गरीब, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांना बसत आहे. एसटी सेवा बंद असल्याने अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अवास्तव भाडे आकारले जात आहे. या परिस्थितीचा काही खाजगी वाहनचालकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याची तक्रारही प्रवाशांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे अवजड वाहने, मालवाहू ट्रक आणि खाजगी चारचाकी वाहने या मार्गावरून सुरू असताना केवळ एसटी वाहतूक बंद ठेवण्यामागचे कारण काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने सुरक्षा हा निकष लावत निर्णय घेतला असेल, तर तो सर्व वाहनांसाठी समान असायला हवा. अन्यथा एसटी वाहतूकही तातडीने सुरू करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड, कुंभरोशी, आंबेनळी आणि परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचा प्रमुख उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. पर्यटकांची ये-जा कमी झाल्यास हॉटेल, लॉज, होमस्टे, रेस्टॉरंट, स्थानिक व्यावसायिक, फळविक्रेते, वाहनचालक आणि इतर लघु व्यावसायिकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे घाट बंद राहिल्यास संपूर्ण परिसराच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन वास्तववादी निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असेल आणि इतर वाहने सुरू असतील, तर एसटी सेवा सुरू करण्यात कोणतीही अडचण नसावी.
यामुळे रायगड आणि सातारा जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे घाटाची पाहणी करून वस्तुस्थिती जाहीर करावी, संभ्रम दूर करावा आणि एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करून सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटन व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी प्रतापगड व कुंभरोशी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment