महाबळेश्वर एसटी आगारातील कारभारावर प्रश्नचिन्ह; प्रवाशांकडून चौकशी व सुधारणा उपाययोजनांची मागणी
महाबळेश्वर एसटी आगारातील कारभारावर प्रश्नचिन्ह; प्रवाशांकडून चौकशी व सुधारणा उपाययोजनांची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील एसटी आगारातील विविध प्रशासकीय व सेवा-संबंधित समस्यांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे. आगारातील स्वच्छतेचा अभाव, बससेवेच्या नियोजनातील त्रुटी, प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची अपुरी व्यवस्था तसेच दैनंदिन कामकाजातील काही अडचणी याबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याची माहिती पुढे येत आहे.
विशेषतः पावसाळी आणि पर्यटन हंगामात महाबळेश्वर येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अशा परिस्थितीत बसस्थानक परिसरातील स्वच्छता, बस वेळापत्रकांचे योग्य नियोजन, प्रवाशांना अचूक माहिती मिळणे, प्रतीक्षागृहातील सुविधा तसेच वाहतुकीचे सुरळीत व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, या सेवांमध्ये अपेक्षित दर्जा दिसून येत नसल्याची भावना काही प्रवासी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आगार प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या व तक्रारींकडे अधिक गांीर्याने लक्ष देण्याची गरज असून अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे नाराजी वाढत आहे. यासंदर्भात आगार व्यवस्थापक महेश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबतही काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तथापि, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर आगाराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. आगारातील विविध तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक त्या सुधारणा उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, जेणेकरून प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटननगरी महाबळेश्वरची ओळख आणि येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची प्रतिमा कायम राखण्यासाठी आगार प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणी समजून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि प्रवाशांच्या मागण्यांवर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment